रस्ते सुचवा, रस्त्यांचे भाग्य उजळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:52 IST2021-02-05T05:52:24+5:302021-02-05T05:52:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दर वीस वर्षांनी बदलणारा रस्ते विकास कार्यक्रम २०२१ - २०४१ साठी जाहीर झाला असून ...

रस्ते सुचवा, रस्त्यांचे भाग्य उजळवा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दर वीस वर्षांनी बदलणारा रस्ते विकास कार्यक्रम २०२१ - २०४१ साठी जाहीर झाला असून यात ग्रामीण रस्त्यांसाठी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य किंवा संबधित अधिकाऱ्यांना रस्ते सुचवून त्या रस्त्यांचे भाग्य उजळविण्याची संधी ग्रामस्थांना मिळणार आहे. यासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेला पत्र प्राप्त झाले असून तसे प्रस्ताव मागविण्यात आल्याची माहिती जि. प. उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती लालचंद पाटील यांनी दिली.
जि. प. अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील व सभापतींच्या उपस्थितीत यासंदर्भात नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या रस्ते विकास कार्यक्रमांअंर्तत गावाला जोडणारे शिवरस्ते, शेत रस्ते, वहिवाट ज्यांना भूसंपादनाची गरज नाही असे रस्ते प्रस्तावित करण्यात येणार आहे. कोणत्याही ग्रामस्थांनी असे वापराचे रस्ते, संबधित यंत्रणेला सुचविल्यास या रस्त्याचे भाग्य उजळून त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळून जि. प. अंतर्गत या रस्त्यांचे डांबरीकरण होणार आहे. त्यामुळे गावे जोडली जाणार आहे. शेत रस्ते सुस्थितीत येऊन मोठी अडचण दूर होणार आहे. मात्र, यात लोकसहभाग अधिक महत्वाचा असल्याचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी सांगितले.