अत्याधुनिक शवदाहिनीचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:02 IST2021-02-05T06:02:10+5:302021-02-05T06:02:10+5:30
केशवस्मृती प्रतिष्ठानाचा पुढाकार : पुढील आठवड्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत ...

अत्याधुनिक शवदाहिनीचे काम पूर्ण
केशवस्मृती प्रतिष्ठानाचा पुढाकार : पुढील आठवड्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे अत्याधुनिक शवदाहिनी बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. पुढील आठवड्यात या आधुनिक शवदाहिनीच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. या शवदाहिनी बसविण्याच्या कामाला सात महिन्यांपूर्वी सुरुवात झाली होती. अखेर काम आता पूर्ण झाले असून, आठवडाभरातच या शवदाहिनीमध्ये मृतदेहावर तत्काळ अंत्यसंस्कार करता येणार आहेत. यामुळे लाकूड व इतर इंधनाचा खर्चदेखील वाचणार असल्याची माहिती केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी दिली.
आधुनिक शवदाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी नेरी नाका स्मशानभूमीच्या आवारात झालेल्या पत्रकार परिषदेत अमळकर बोलत होते. यावेळी प्रकल्प प्रमुख नंदू अडवाणी, जनता बँकेचे अध्यक्ष प्रा.अनिल राव, रिखबराज बाफना, उद्योजक दिलीप चोपडा, केशव स्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील, समन्वयक सागर येवले आदी उपस्थित होते. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मृतांची संख्यादेखील वाढत होती. जून महिन्यात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शहरात मनपाच्यावतीने विद्युतदाहिनी बसविण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचना देऊनही मनपा प्रशासनाने फारसे लक्ष दिले नव्हते. त्यानंतर तत्कालीन स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा यांनी केशव स्मृती प्रतिष्ठानच्या सहकार्याने स्मशानभूमीत गॅसदाहिनी बसविण्याचा प्रस्ताव दिला होता. केशव स्मृती प्रतीष्ठाननेदेखील मनपाचा प्रस्ताव मान्य करत कामाला सुरुवात केली होती. फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या स्थायी समितीच्या सभेत केशव स्मृती प्रतिष्ठानने शहरात गॅसदाहिनी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला होता. या सभेत प्रस्तावाला मंजुरीदेखील देण्यात आली होती. मात्र, मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतर हा प्रस्ताव रखडला होता. दरम्यान, आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनंतर मनपाने केशव स्मृती प्रतिष्ठानच्या संचालकांशी चर्चा करत, आवश्यक मशिनरी उपलब्ध करून दिली.
पर्यावरणाचे होणार संवर्धन
एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही झाडांची कत्तल करावी लागते. तसेच पावसाळ्यात लाकडांसाठी अनेक अडचणींचा सामनादेखील करावा लागतो. नेरी नाका स्मशानभूमीत दिवसभरात १० ते १२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असतात. या अत्याधुनिक शवदाहिनीमुळे झाडांची होणारी कत्तल थांबणार असून, पर्यावरणाची बचत होणार असल्याची माहिती रिखबराज बाफना यांनी दिली. रिखबराज बाफना, दिलीप चोपडा यांनीही या शवदाहिनीसाठी देणगी दिल्याची माहिती नंदू अडवाणी यांनी दिली.
शवदाहिनीची काय आहेत वैशिष्ट्ये...
१. गॅसदाहिनीसाठी अंदाजे ५० लाखांपर्यंतचा खर्च लागला आहे.
२. एका मृतदेहावर ४५ मिनिटात अंत्यसंस्कार होणार आहेत.
३. शवदाहिनी पूर्णपणे एलपीजी गॅसवर कार्यान्वित राहणार.
४. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर २ तासांनी अस्थी उपलब्ध होणार.
५. एका दिवसात ८ ते १० मृतदेहांवर होऊ शकतात अंत्यसंस्कार.
६. मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी १५०० रुपयांचे शुल्क संस्थेकडून आकारले जाणार आहे.
७. शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी मिळून स्थापन झालेल्या स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून चालणार काम.
८. बडोदा येथील विश्वकर्मा कंपनीने तयार केली शवदाहिनी.