भुसावळ : मंगलमय वातावरणात ज्येष्ठा कनिष्ठा गौरी अर्थात महालक्ष्मीचे थाटात स्वागत आवाहन करीत पारंपरिक पद्धतीने घरोघरी विधीवत स्थापना करण्यात आली.
शहर व परिसरात गौरीचे उत्साहात आवाहन करून स्थापना करण्यात आली. पावसाच्या सरीत तेसुद्धा या प्रसंगी आगमन झाल्यामुळे उत्साहात भर पडली.
गौरीच्या तीन दिवस चालणाऱ्या उत्सवामुळे सर्वत्र घरोघरी सकाळपासूनच चैतन्याचे वातावरण होते. अंबा मातेचा जयजयकार करीत गौरीचे मुखवटे मंगल ध्वनीच्या सुरात घरात आणण्यात आले. घरात आणतांना गौरींचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर त्यांची विधीवत स्थापना झाली. गौरी आवाहनाच्या पद्धती घरपरत्वे वेगवेगळ्या पाहायला मिळाल्या. महालक्ष्मीच्या लाकडी तर काही ठिकाणी लोखंडी पत्र्याच्या कोठीत धान्य, फराळाचे साहित्य भरण्यात आले. त्यानंतर गौरींना भरजरी साड्या नेसवून देवींचा विविध अलंकार, दागिने यांचा साज घालून शृंगार करण्यात आला. ज्येष्ठा-कनिष्ठा अशा दोन गौरी, बाळ गणेश यांची स्थापना करण्यात आली. याठिकाणी सुशोभित आरास सजावट व रोषणाई करण्यात आली.
याप्रसंगी महालक्ष्मीसमोर धान्याची रास भरण्यात आली काही ठिकाणी धान्यावर देवीचे मुखवटे ठेवून तर काही ठिकाणी उभ्या महालक्ष्मीची परंपरेनुसार स्थापना झाली. सायंकाळी मंत्र जागरण, शांती पाठाचा कार्यक्रम झाला. देवीच्या समोर हळदी कुंकवाचे करंडे ठेवण्यात आले होते.
भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे आवाहान केले जाते. पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर तर विसर्जन हे मूळ नक्षत्रावर होत असते. परंपरेनुसार हा उत्सव साजरा केला जातो. यंदा १२ सप्टेंबर रोजी रविवारी अनुराधा नक्षत्र उशिराने असल्याने अर्थात म्हणजे ९ वाजून ५० मिनिटांनंतर गौरी आवाहन करण्यात आले. गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळे वलय आहे. यामध्ये गौरींची स्थापना करून त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात.
आज ज्येष्ठा लक्ष्मीचे पूजन, महानैवेद्य
भक्ती चैतन्याच्या वातावरणात आवाहन करून स्थापन झालेल्या गौरींचे १३ रोजी सोमवारी पूजन अर्चन करून महानैवेद्य अर्पण करण्यात येईल. कुटुंबात लक्ष्मीचा वास राहून सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य सुख, समृद्धी घरात नांदावी यासाठी गौरीपूजन, अर्चन करण्यात येते. ज्येष्ठा नक्षत्रावर केवडा, पडवळ, कमळाचे फूल, सोळा प्रकारची पत्री, विविध पुष्पांनी लक्ष्मीचे पूजन करण्यात येते. पुरणपोळी, लाडू , करंजी, सोळा प्रकारच्या भाज्या, अनारसे, सांजोरी यासह अन्य पंचपक्वान्नांचा महानैवेद्य देवीला अर्पण करण्यात येत असतो. सोळा भाज्यांसह पंचपक्वान्नांचा नैवेद्य, तांबूल देण्यात येईल. महालक्ष्मी स्थापनेमुळे घराघरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. ज्वारीचे पीठ, ताकापासून तयार करण्यात आलेल्या अंबिलाचा महानैवेद्याला अनन्य महत्त्व आहे.
उद्या होणार विसर्जन
गौरीचे मूळ नक्षत्रावर विसर्जन करण्याची प्रथा आहे. यंदा १४ रोजी मंगळवारी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनंतर केव्हाही गौरी विसर्जन होईल. काही वेळेस गौरी आवाहन किंवा विसर्जनाकरिता ठरावीक वेळेची मर्यादा नसते. मात्र, यावर्षी आवाहन व विसर्जनाकरिता मर्यादा दिलेली आहे. त्या मर्यादेत कधीही आवाहन आणि विसर्जन करता येईल. मंगळवार असला तरी विसर्जन त्यादिवशी परंपरेनुसार करता येईल, शास्त्रानुसार सांगितले जाते.