आईच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने मुलाने केला बापाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:15 IST2021-09-13T04:15:43+5:302021-09-13T04:15:43+5:30
जळगाव : सतत आईच्या चारित्र्यावर संशय घेत असलेल्या प्रेमसिंग अभयसिंग राठोड (वय ५०, मूळ रा. घनश्यामपूर, ता. खकनार, जि. ...

आईच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने मुलाने केला बापाचा खून
जळगाव : सतत आईच्या चारित्र्यावर संशय घेत असलेल्या प्रेमसिंग अभयसिंग राठोड (वय ५०, मूळ रा. घनश्यामपूर, ता. खकनार, जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यांचा मुलाने छातीत चॉपर खुपसून खून केल्याची घटना रविवारी सकाळी साडेदहा वाजता निमखेडी शिवारातील कांताई नेत्रालयाजवळ घडली. गोपाल व दीपक या दोन्ही मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमसिंग याला दवाखान्यात नेण्याच्या कारणावरून वादाची ठिणगी पडली अन् खुनाची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून नातेवाईक व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमसिंग राठोड याला कानाचा त्रास होता. रविवारी त्याला शहरातील दवाखान्यात नेऊन नंतर बऱ्हाणपूर येथे घेऊन जाण्याबाबत मुलगा गोपाल व दीपक या दोघांनी आग्रह केला. यावेळी प्रेमसिंग याने त्यास विरोध करून तिकडे गेल्यावर मागे पत्नी दुसऱ्या लोकांच्या संपर्कात राहते असे बोलून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्यामुळे मुले व बाप यांच्यात वाद झाला. दीपक याने दांडक्याने बापाला मारले तर प्रेमसिंग याने घरात लपवून ठेवलेला चॉपर आणून दोन्ही मुलांवर हल्ला करणार तितक्यात गोपाल याने हा चॉपर हिसकावून प्रेमसिंग याच्या छातीवर, डोक्यावर कमरेजवळ वार केले. त्यात प्रेमसिंग जागीच गतप्राण झाला.
पोलिसांनी घेतले दोघा मुलांना ताब्यात
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सर्वात आधी पोलिसांनी गोपाल व दीपक या दोन्ही मुलांना ताब्यात घेतले, त्यानंतर चॉपर जप्त केला. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनीही घटनास्थळी धाव घेऊन मृताच्या कुटुंबीयांची चौकशी केली. दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर १२ वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला.
दोन वर्षांपासून वास्तव्य
कांताई नेत्रालयाच्या बाजूलाच गोशाळा आहे. तेथे प्रेमसिंग राठोड व त्याची पत्नी बसंती दोघं जण या जनावरांची देखभाल करतात. गेल्या दोन वर्षापासून राठोड, पत्नी बसंती, मुलगी शिवानी व कविता अशांसह वास्तव्याला आहेत. वर्षभरापासून गोपाल व दीपक हे दोन्ही मुले रहायला आली होती. मुले रोजंदारीने मिळेल ते काम करतात.