आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : खेळता खेळता अनेक लहान मुले नाण्यांसारख्या वस्तू थेट गिळतात. अशीच काही बालके शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येत असतात. यात गेल्या तीन महिन्यात अशा प्रकारच्या तीन बालकांवर या ठिकाणी उपचार झाले आहे. मात्र, पालकांचे मुलांकडील असे दुर्लक्ष हे धोकादायक ठरू शकते, असे डॉक्टरांचे मत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या दीड वर्षाच्या काळात नॉन कोविड यंत्रणा ही काहीच महिने सुरू होती. गेल्या दोन महिन्यांपासून ही यंत्रणा पूर्वपदावर आहे. यात बालकांच्या तपासणी कक्षात आता गर्दी वाढली आहे. यात व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण अधिक येत आहेत. मात्र, गेल्या दोन महिन्यापूर्वी दोन बालकांनी नाणे गिळल्याचा प्रकार घडल्यानंतर या बालकांना या ठिकाणी उपचारासाठी आणण्यात आले होते.
मुले काय करतील याचा नेम नाही
- जळगावातील दोन लहान बालकांनी नाणे गिळले होते. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यशस्वी उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती.
- काही महिन्यांपूर्वी एका बालकाच्या नाकात शेंगदाणा अडकला होता. त्याच्यावरही या ठिकाणी यशस्वी उपचार करण्यात आले होते.
- एका बालकाने गोळ्या खाल्ल्या होत्या.
शस्त्रक्रिया नाही
नाणी किंवा त्यासारख्या वस्तू गिळल्यानंतर सिव्हिलला उपचारासाठी येणाऱ्या बालकांची संख्या कमी आहे. त्यात अशा प्रकारची शस्त्रक्रिया अद्याप या ठिकाणी झालेली नाही.
अशी घ्या मुलांची काळजी
लहान मुलांच्या हालचालीकडे पालकांचे बारकाईने लक्ष असणे गरजेचे आहे. जोपर्यंत कुठल्या वस्तूपासून आपल्याला हानी होते हे बाळांना समजत नाही तोपर्यंत त्यांना एकटे सोडू नये, त्यांच्या हाती तोंडात जाईल अशी धोकादायक वस्तू देऊ नये, पालकांनी याबाबतीत अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे.
नाणे किंवा वस्तू गिळल्यानंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या बालकांची संख्या कमी आहे. गोळ्या, खाणे, किंवा काही औषधी पिऊन टाकणे, अशा काही केसेसशिवाय नाणे अडकणे, शेंगदाणे नाकात अडकणे अशा काही केसेस आल्या आहेत. मात्र, त्या अगदी कमी आहेत. - डॉ. बाळासाहेब सुरोसे, बालरोगतज्ज्ञ