प्रधानमंत्री आवासच्या २८ लाख घरकुलांमध्ये पेटणार सौर मशाल! राज्य शासनाचा आनंदप्रकाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 14:02 IST2026-01-24T14:01:50+5:302026-01-24T14:02:27+5:30
लाभार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार

प्रधानमंत्री आवासच्या २८ लाख घरकुलांमध्ये पेटणार सौर मशाल! राज्य शासनाचा आनंदप्रकाश
कुंदन पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: ग्रामीण भागातील २८ लाख कुटुंबांच्या आयुष्यात उजेडाची नवी पहाट घेऊन येणारी ही बातमी आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील (ग्रामीण) टप्पा क्र. २ तसेच २०२४-२५ या कालावधीतील लाभार्थ्यांना राज्य शासनाच्यावतीने प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अतिरिक्त अर्थसहाय्य देऊन या घरकुलांवर सौर ऊर्जा प्रणाली (१ किलो व्हॅट) कार्यान्वित करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) केंद्र व राज्याच्या हिश्श्यातून १ लाख २० हजारांचे अर्थसहाय्य दिले जाते. मात्र राज्य शासनाने गेल्यावर्षी एक निर्णय घेत अतिरिक्त ५० हजारांचे अर्थसहाय्य देण्याची तयारी ठेवली. ५० हजारांपैकी ३५ हजार रुपये घरकुलाच्या अतिरिक्त कामासाठी तर १५ हजार रुपये सूर्यघर योजनेंतर्गत वापरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ किलोव्हॅट क्षमतेची सौर ऊर्जा यंत्रणा जोडली जाईल.

कार्यपद्ध्ती निश्चित, यंत्रणा जोडल्यावरच अनुदान
२७ लाख ८५ हजार ८१९ घरांवर उभारण्यासाठी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी कार्यपद्धत निश्चित केली आहे. त्यानुसार या घरकुलांमध्ये प्रकाश पेरणीसाठी प्रशासनाने सौर ऊर्जेची मशाल हाती घेतली आहे.