तर... यांची असणार शाळास्तरावरील ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 20:26 IST2020-08-12T20:26:31+5:302020-08-12T20:26:43+5:30
जळगाव : जिल्ह्यातील शाळांमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत असतो. मात्र, ...

तर... यांची असणार शाळास्तरावरील ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती
जळगाव : जिल्ह्यातील शाळांमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत असतो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ शालेय समिती अध्यक्ष, सदस्य तसेच पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात यावा, अशा सूचना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. त्याबाबत आदेश काढण्यात आले आहे.
दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळांकडून प्रभात फेरी काढण्यात येत असते़ त्यात विद्यार्थ्यांचे लेझीम पथक तसेच ढोल पथकांचाही समावेश असतो़ नंतर विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्व शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना पटवून दिले जात असते. मात्र, यंदा कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले असल्यामुळे सध्या शाळा बंद आहेत़ त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण दिले जात आहे. त्यातच शनिवारी स्वातंत्र्य दिन असल्यामुळे शिक्षण विभागाकडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत़ त्यात ध्वजारोहण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना बोलविण्यात येवू नये, असे आदेशात म्हटले आहे़ तसेच शाळा स्तरावरील कार्यक्रमात सामाजिक अंतरचे पालक करण्यात यावे व मास्क लावणे बंधनकारक असणार आहे़ ध्वजारोहणाचा कार्यक्रम हा शाळा स्तरावर सकाळी ८.३५ वाजेच्यापूर्वी आयोजित करण्यात यावा, असेही आदेशात म्हटले आहे़ तर कुठल्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचेही प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी सांगितले आहे.