चांदी पुन्हा ८०० रुपयांनी वधारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 20:19 IST2020-11-07T20:18:57+5:302020-11-07T20:19:11+5:30
सोन्याच्याही भावात ३५० रुपयांनी वाढ : मागणी वाढत असल्याचा परिणाम

चांदी पुन्हा ८०० रुपयांनी वधारली
जळगाव : सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा चांदीच्या भावात ८०० रुपयांनी वाढवून चांदी ६६ हजार ३०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. अशाच प्रकारे सोन्याच्याही भावात साडेतीनशे रुपयांनी वाढ होऊन सोने ५२ हजार ७०० रुपयांवर पोहोचले. भारतासह जगभरात मागणी वाढत असल्याने सोने चांदीचे भाव वाढत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध व्यवसायावर परिणाम झालेला असताना सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे कल वाढला व दोन महिन्यांपूर्वी सोने चांदीचे भाव चांगलेच वधारले. त्यानंतर हे भाव काहीसे कमी झाले होते. मात्र नवरात्र उत्सव व विजयादशमी काळात पुन्हा सोने-चांदी महागले. त्यानंतर आठवडाभर भाव काहीसे कमी झाले. त्यानंतर आता गेल्या आठवड्यापासून तर सतत भाववाढ होत आहे.
शुक्रवारी एक हजार रुपयांनी वाढ झालेल्या चांदीच्या भावात शनिवारी पुन्हा ८०० रुपयांनी वाढ होऊन चांदी ६६ हजार ३०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. त्याचप्रमाणे सोन्याच्या भावात देखील शुक्रवारी १५० रुपयांनी वाढ झाल्यानंतर शनिवारी पुन्हा ३५० रुपयांनी वाढ होऊन ते ५२ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.
डॉलरचे भाव कमी होत असताना सोने-चांदीत वाढ
एरव्ही भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलरचे भाव वाढले तर सोने-चांदीही महाग होते. मात्र गेल्या पाच दिवसापासून डॉलरचे भाव सतत कमी होत असतानाही सोने-चांदी वधारत आहे. यात २ नोव्हेंबर रोजी डॉलर ७४.४७ रुपये होता. त्यानंतर ६ रोजी तो ७४.०३ व ७ रोजी पुन्हा डॉलरचे दर घसरून ७३.९८वर आले. डॉलरचे हे दर कमी होत असले तरी जगभरात सोने-चांदीला मागणी वाढत आहे. त्यात भारतात सणासुदीचा काळ सुरू झाल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
आठवडाभरात सोने चांदीत झालेली वाढ
दिनांक सोने चांदी
२९ आॅक्टोबर ५१,००० ६१,०००
२ नोव्हेंबर ५१,४०० ६२,५००
५ नोव्हेंबर ५२,२०० ६४,५००
६ नोव्हेंबर ५२,३५० ६५,५००
७ नोव्हेंबर. ५२,७०० ६६,३००