धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 07:25 IST2025-04-28T07:25:23+5:302025-04-28T07:25:55+5:30
आपल्या मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग तब्बल दोन वर्षांनंतर उफाळून आला. यातून पित्याने आपल्या कन्येलाच गोळ्या घालून ठार केले.

धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
चोपडा (जि. जळगाव) : आपल्या मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग तब्बल दोन वर्षांनंतर उफाळून आला. यातून पित्याने आपल्या कन्येलाच गोळ्या घालून ठार केले. यात दोन गोळ्या जावयाला लागल्या. तो थोडक्यात बचावला आहे. आता जावयावर पुण्यात, तर मुलीच्या वडिलांवर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बाप-मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तृप्ती अविनाश वाघ (२४) असे मृत कन्येचे नाव आहे. तृप्ती हिने दोन वर्षांपूर्वी अविनाश ईश्वर वाघ (२८, दोघे रा. करवंद, शिरपूर, ह. मु. कोथरूड, पुणे) याच्याशी प्रेमविवाह केला होता. हा विवाह तृप्तीचा बाप आणि निवृत्त सीआरपीएफ जवान किरण अर्जुन मंगळे (४८, रा. शिरपूर) यांना पसंत नव्हता. किरण याने आपल्याकडील पिस्तुलातून गोळी झाडली. त्यात तृप्ती ही जागीच ठार झाली, तर जावई अविनाश हा जखमी झाला. यानंतर तिथे असलेल्या नातेवाइकांनी किरण यास पकडून मारहाण केली. त्यात तोही जखमी झाला आहे.
दरम्यान, याप्रकरणी किरण मंगळे व त्याचा मुलगा निखिल मंगळे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृप्ती हिच्यावर चोपडा येथे रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.