धक्कादायक! प्रेमविवाहाच्या चौथ्या वर्षी जावयाची निर्घृण हत्या; चिमुकलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:41 IST2025-01-20T16:37:09+5:302025-01-20T16:41:47+5:30
रविवारी सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला. त्यावेळी पूजाच्या माहेरील मंडळींनी कोयता, चॉपरने त्याच्या मानेवर वार केला.

धक्कादायक! प्रेमविवाहाच्या चौथ्या वर्षी जावयाची निर्घृण हत्या; चिमुकलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले
Jalgaon Murder Case : चार वर्षांपूर्वीच्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुलीकडील लोकांनी रविवारी सकाळी जळगाव जिल्ह्यातील पिंप्राळा हुडको परिसरात सशस्त्र हल्ला करत जावयाला ठार केले. कोयता आणि चॉपरने वार करण्यात आल्याने मुकेश रमेश शिरसाठ या प्रेमविवाहित २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबातील सात जण जखमी झाले. रामानंदनगर पोलिस ठाण्यात तरुणीचा भाऊ, काका यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मयत मुकेशच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी व मुलगी आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश याने चार वर्षापूर्वी त्याच परिसरातील पूजा नावाच्या तरुणीशी पळून जाऊन विवाह केला होता. तेव्हापासून शिरसाठ कुटुंबीय व तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये वाद सुरू आहे. रविवारी सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला. त्यावेळी पूजाच्या माहेरील मंडळींनी कोयता, चॉपरने त्याच्या मानेवर वार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मयताचा भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण यांच्यावरही वार केल्याने ते जखमी झाले. मुकेशच्या मृत्यूने त्याच्या चिमुकल्या मुलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले आहे.
९ जणांविरुद्ध गुन्हा
हत्येप्रकरणी पोलिस ठाण्यात तरुणीचे काका, भाऊ, बाबा, चुलत, आतेभाऊ अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पिंप्राळा व शासकीय रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण होते.
मुलाच्या मृत्यूनंतर आईला भोवळ
रुग्णालयात मुकेशच्या मृत्यूची वार्ता समजताच सर्वांना धक्का बसला. त्यावेळी मयताची आई उज्ज्वला यांना भोवळ येऊन त्या बेशुद्ध पडल्या. त्यावेळी त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मयत, जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथे त्यांचे कुटुंबीय, मित्रांची मोठी गर्दी झाली होती. मयताचे आई, वडील यांच्यासह घरातील सर्व सदस्यांनी मोठा आक्रोश केला. तसेच हल्ला करणाऱ्या कुटुंबीयांबद्दल संताप व्यक्त केला.