चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 02:59 IST2025-04-27T02:58:26+5:302025-04-27T02:59:08+5:30
गोळीबाराची ही थरारक घटना चोपडा शहरातील डॉ. आंबेडकर नगरात शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली...

चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी
श्याम जाधव -
चोपडा (जि.जळगाव) : दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेल्या स्वत:च्या मुलीवरच सीआरपीएफच्या निवृत्त जवानाने गोळी झाडून तिचा खून केला. या गोळीबारात जावाईही गंभीर जखमी झाला. गोळीबाराची ही थरारक घटना चोपडा शहरातील डॉ. आंबेडकर नगरात शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर लोकांनी या निवृत्त जवानाला मारहाण केली. यात तोही गंभीर जखमी झाला आहे.
तृप्ती अविनाश वाघ (२४) असे मृत कन्येचे नाव आहे. तृप्ती हिने दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. जावाई अविनाश ईश्वर वाघ (२८, दोघे रा. करवंद,शिरपूर, ह. मु. कोथरूड, पुणे) आपल्याच जातीचा असूनही सासरा आणि निवृत्त जवान किरण अर्जून मंगले (४८, रा. शिरपूर) याला हा विवाह पसंत नव्हता.
बहिणीकडील विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी सायंकाळी चोपड्यात आले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर किरण व तृप्ती हे समोरासमोर आले. तृप्ती हिला पाहताच किरण याने त्याच्याकडील रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली. यात तृप्ती ही खाली पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. तिला वाचविण्यासाठी अविनाश गेला असता तोही गोळी लागून जबर जखमी झाला. अविनाश याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगावला हलविण्यात आले आहे.
इकडे संतप्त नातेवाईकांनी किरण मंगले यास पकडून मारहाण केली. या मारहाणीत तोही जबर जखमी झाला आहे. त्यालाही पुढील उपचारसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी रात्री १२:१५ वाजेच्या सुमारास जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली.