Seven-year-old girl killed in dumper-car collision | डंपर-कारच्या धडकेत सात वर्षीय बालिका ठार
डंपर-कारच्या धडकेत सात वर्षीय बालिका ठार

जळगाव- शहरात नातेवाईकाचा वाढदिवस साजरा करून भुसावळसाठी निघालेल्या मनवाणी कुटूंबीयांच्या कारला शनिवारी रात्री ११.१५ वाजता भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, कारचा पुढील भागाचा चुराडा झाला तर स्वरा मनवाणी या सात वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना खेडीजवळील हॉटेल गौरवसमोर घडली़ या अपघात चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
भुसावळ येथील गौतम मनवाणी (वय-३५), प्रिती मनवाणी (वय-३०), माही मनवाणी (वय-१२) तसेच स्वरा मनवाणी (वय-०७) तसेच वैभव मुलचंदाणी (वय-३०, रा़ हौशंगाबाद, मध्यप्रदेश) हे शनिवारी कारने (एमएच.१९.बीजे.९६८) जळगाव शहरात किर्तीका मनवाणी हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. वाढदिवस साजरा झाल्यानंतर सर्व चित्रपट पाहण्यासाठी खान्देश सेंट्रल मॉल येथे आले. त्यानंतर रात्री तेथूनच मनवाणी कुटूंब आणि वैभव मुलचंदाणी हे त्यांच्या कारने भुसावळ येथे जाण्यासाठी रवाना झाले. दरम्यान, भुसावळ येथून एमएच.२१.एक्स.५१९३ क्रमांकाचा डंपर हा जळगावच्या दिशेने येत होता. तर खेडी गावाजवळील हॉटेल गौरवसमोरील महामार्गावर मनवाणी कुटूंबीयांच्या कारला या डंपरने जोरदार धडक दिली. आणि या भिषण अपघातात स्वरा मनवाणी या सात वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील गौतम मनवाणी, वैभव मुलचंदाणी, प्रिती मनवाणी, माही मनवाणी हे गंभीर जखमी झाले. त्यांना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्वरित जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर चौघांना खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले होते. यावेळी नातेवाईकांची रूग्णालयात प्रचंड गर्दी झाली होती.
 

 

 


Web Title:  Seven-year-old girl killed in dumper-car collision
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.