जळगाव-चाळीसगाव महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 16:49 IST2021-02-05T16:48:47+5:302021-02-05T16:49:30+5:30
जळगाव-चाळीसगाव महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.

जळगाव-चाळीसगाव महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच
प्रमोद ललवाणी
कजगाव, ता.भडगाव : जळगाव-चाळीसगाव महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. शिर्डीवरून पहूरकडे निघालेल्या लोढा परिवाराच्या कारला भडगावजवळ अपघात झाला. यात तीन जण किरकोळ जखमी झाले तर एकास फ्रॅक्चर झाले आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर दीडला हा अपघात झाला.
याबाबत वृत्त असे की, पहूर येथील व्यापारी प्रकाशचंद लोढा हे परिवारासह शिर्डी येथे कार (एमएच-१९-बीजे-६८१८) ने गेले होते. रात्री दीडच्या दरम्यान पहूरकडे जात होते. तेव्हा कजगाव-भडगाव मार्गावर भडगावपासून एक किलोमीटर अंतरावर तालुका कृषी कार्यालयासमोर चालकाचा कारवरील ताबा सुटला अन् कार थेट रस्त्यावरून सरळ अंदाजे १५ फूट खोल खाली रस्त्याच्या कडेला कोसळली. कार दोन-तीन वेळेद उलटली. यात प्रकाशचंद लोढा, प्रीतेश लोढा, हितेश लोढा व कोमल लोढा यांना मुकामार बसला आहे. कारच्या काचा फुटल्यामुळे खरचटले आहे, तर प्रीतेश लोढा यांना फ्रॅक्चर झाले आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले .
युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस मदतीला
गाडीचा अपघात झाला त्या दरम्यान या मार्गावरून युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील (भडगाव) हे जात होते. अपघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या ठिकाणी तत्काळ मदत करत लोढा परिवारास बाहेर काढले. वाहन उपलब्ध करून दिले. डॉक्टरकडे नेण्यासाठीदेखील विचारपूस करीत घाबरलेल्या परिवारास मोठा धीर दिला व मदत उपलब्ध करून दिली.