जळगाव शहर व परिसरातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जात असतात. मात्र, शेगावला जाण्यासाठी जळगाव आगार प्रशासनातर्फे कुठलीही बससेवा नसल्यामुळे भक्तांची गैरसोय होत आहे. यामुळे नागरिकांना रेल्वेने शेगावला जावे लागत होते. तसेच सध्या कोरोनामुळे अनेक रेल्वे गाड्याही बंद असल्यामुळे नागरिकांना जादा पैसे मोजून खासगी वाहने करून शेगावला जावे लागत होते.
शेगावला जाणाऱ्या नागरिकांच्या गैरसोयीबाबत `लोकमत`ने ३ जानेवारी रोजी शेगाव येथे बससेवा सुरू करण्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत जळगाव आगार प्रशासनाने दर शनिवारी जळगाव आगारातून दुपारी ४ वाजता शेगावसाठी स्वतंत्र तीर्थक्षेत्र बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
इन्फो :
नांदुरा येथील तीर्थक्षेत्रावरही थांबणार :
जळगावहून शेगावसाठी ही बस दुपारी २ वाजता निघून, ५ वाजता नांदुरा येथील १०५ फुटी मारोती असलेल्या तीर्थक्षेत्रावर जाणार आहे. तसेच या ठिकाणाहून जवळ असलेल्या प्रति बालाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री बालाजीच्या मंदिराकडे जाणार आहे. या ठिकाणी भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी ७पर्यंत शेगावनगरीत दाखल होणार आहे. या ठिकाणी रात्रभर थांबून दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता जळगावच्या दिशेने रवाना होणार आहे.
इन्फो -
जळगाव आगारातून पहिल्यांदाच शेगावसाठी स्वतंत्र तीर्थक्षेत्र बस ९ जानेवारीपासून सुरू करण्यात येत आहे. ही बस रस्त्यातील नांदुरा येथील १०५ फुटी मारोती व नांदुराहून जवळ असलेल्या श्री बालाजी मंदिर या ठिकाणींही थांबणार आहे. या बसमुळे भाविकांचा शेगावला जाणे सोयीचे होणार आहे.
-प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार