लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बोदवड येथे मारहाणीत जखमी झालेल्या नातवाला बघण्यासाठी आलेल्या आजोबाचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. शेख अयास अब्दूल रज्जाक (५२) असे मृताचे नाव आहे. मुजाहिद अली मुझ्झफर अली अजगर अली या तरुणाला बघण्यासाठी ते आलेले होते.
मुजाहिद अली याला गुरे चोरीच्या संशयावरून जमावाकडून मारहाण झाली होती. त्यानंतर पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या तरुणाला जखमी अवस्थेत १० सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रात्री ९ वाजता दाखल करण्यात आल्याचे मुलाचे वडील अजगर अली यांनी सांगितले. या मुलाला बघण्यासाठी त्याचे पाळधी येथील आजोबा शेख अयास अब्दूल रज्जाक हे त्यांचा भाऊ मोहम्मद कासीम यांच्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आले होते. मुजाहिदला ९ क्रमाकांच्या कैदी वाॅर्डात दाखल केले होते. या ठिकाणी नातवाला बघून त्यांना चक्कर आली व ते खाली कोसळल्याने डॉक्टरांनी जागीच त्यांना मृत घोषित केल्याचे अजगर अली यांनी सांगितले. यावेळी जिल्हा रुग्णालयात बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमजद रंगरेज, युवाध्यक्ष पराग कोचुरे, शहराध्यक्ष इरफान शेख, सहाय्यक सचिव हारूण मन्सुरी, रियाज पटेल, देवानंद निकम, खुशाल सोनवणे आदी उपस्थित होते.