जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 07:36 IST2025-08-06T07:36:43+5:302025-08-06T07:36:57+5:30
जिल्हा वकील संघांच्या १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये ३६ अर्ज दाखल झाले होते...

जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
जळगाव : जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी ॲड.सागर चित्रे यांनी १०१ मतांनी विजयी होत बाजी मारली. सचिवपदी ॲड.विरेंद्र पाटील, उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे तर सहसचिव ॲड.लिना म्हस्के हे विजयी झाले. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व समर्थकांनी मोठा जल्लोष केला.
जिल्हा वकील संघांच्या १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये ३६ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी तीन अर्ज छाननीवेळी नामंजूर झाल्याने व दोन महिला उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने १३ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात होते. मंगळवारी (५ ऑगस्ट) रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान झाले. यामध्ये एकूण एक हजार १० मतदारांपैकी ८८१ जणांनी (८७.२२ टक्के) मतदान केले. त्यानंतर दुपारी साडेचार वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास अंतिम निकाल समोर आला.
विजयी उमेदवार -
अध्यक्षपदी ॲड. सागर चित्रे यांनी ४५४ मते मिळवून बाजी मारली. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ॲड. संजय राणे (३५३ मते) यांचा १०१ मतांनी पराभव केला. उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झालटे, सचिवपदी ॲड. विरेंद्र पाटील, सहसचिवपदी ॲड.लीना म्हस्के तर कोषाध्यक्षपदी ॲड. प्रवीण चित्ते हे विजयी झाले. रात्री उशिरापर्यंत आठ सदस्य पदांच्या उमेदवारांची मतमोजणी सुरु होती.
बिनविरोध सदस्य -
सदस्यपदासाठी दाखल ॲड.वर्षा पाटील व ॲड.अजयकुमार जोशी यांचे अर्ज छाननीवेळी नामंजूर करण्यात आले होते. यातील ॲड.वर्षा पाटील यांनी अर्ज नामंजुरीविरोधात अपील समितीकडे अपील दाखल केले होते. मात्र ते फेटाळण्यात आले. त्यामुळे महिला सदस्यांच्या दोन जागांसाठी दोनच अर्ज शिल्लक राहिल्याने ॲड.शारदा सोनवणे, ॲड.कल्पना शिंदे या बिनविरोध ठरल्या.
विजय उमेदवारांसह समर्थकांचा जल्लोष -
निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. पुष्पहार घालून व पेढे भरवून विजयी उमेदवारांचे कौतुक करण्यात आले. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. आर.एन. पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. मंगला पाटील, ॲड. ए.आर. सरोदे यांनी काम पाहिले.