'साथ जियेंगे साथ मरेंगे'ची अमळनेरमध्ये आली प्रचिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 11:51 AM2021-03-19T11:51:38+5:302021-03-19T11:52:51+5:30

मात्र कोरोनामुळे पती-पत्नीवर वेगवेगळ्या ठिकाणी झाले अंत्यसंस्कार

'Saath Jiyenge Saath Marenge' came to fruition in Amalner | 'साथ जियेंगे साथ मरेंगे'ची अमळनेरमध्ये आली प्रचिती

'साथ जियेंगे साथ मरेंगे'ची अमळनेरमध्ये आली प्रचिती

googlenewsNext


संजय पाटील
अमळनेर : वृद्धापकाळ आला की पती-पत्नी एकमेकांना आधार बनतात. त्यांच्या जीवनात ते इतके एकजीव झालेले असतात की अशावेळी ते काही काळ जरी एकमेकांपासून दूर गेले तरी शरीरातून निघणारे तरंग सुखदुःखाची जाणीव करून देतात. अशाच एका घटनेचा प्रत्यय शहरातील पैलाड भागात आला. पतीला हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू होताच अवघ्या अर्ध्या तासात लांब अंतरावर असलेल्या पत्नीनेही आपले प्राण सोडल्याची घटना १७ रोजी घडली.
    शहरातील पैलाड भागातील सेवानिवृत्त शिक्षक पुंडलिक बाबुराव मोरे (७३) याना १७ रोजी सकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा शिक्षक असलेला मुलगा एम.पी.मोरे याने त्यांना खाजगी दवाखान्यात नेले. तोपर्यंत सकाळी सात वाजता त्यांचा मृत्यू झालेला होता. तिकडे  पुंडलिक मोरे यांच्या पत्नी दमोताबाई या लग्नानिमित्त  आपल्या जावयाकडे चाळीसगाव येथे गेलेल्या होत्या. दोघे पती पत्नीचे एकमेकांवर भरपूर प्रेम होते. दोघे एकजीव झालेले होते. गेल्या ७ तारखेपासून दमोताबाई घरापासून लांब गेल्या होत्या. त्यांना घराची ओढ लागली होती. सकाळी घाई गडबडीत त्या अमळनेरला येण्यासाठी निघाल्या.  त्यांना पतीच्या घटनेची सूतरामही कल्पना नव्हती. जावई त्यांना अमळनेर येथे आणत असताना त्यांना दुःखद प्रसंगाचे जणू काही संकेत मिळाले होते. भ्रमणध्वनीप्रमाणे तरंगलहरी त्यांच्यापर्यंत पोहचल्या असाव्यात आणि काहीही त्रास नसलेल्या दमोताबाईनी साडेसात वाजेला गाडीत बसल्याबरोबर आपले प्राण सोडले.
प्रेमात एकजीव झालेल्या या  पती पत्नीने सोबत प्राण सोडले, मात्र कोरोना तेथेही आडवा आला. त्यामुळे काळजी म्हणून डॉक्टरांनी दमोताबाईंचे प्रेत अमलनेरला आणू देण्यास नकार दिल्याने त्यांचे अंत्यसंस्कार चाळीसगाव येथे, तर पुंडलिक मोरे यांच्यावर  अमळनेरात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.

Web Title: 'Saath Jiyenge Saath Marenge' came to fruition in Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.