केंद्रीय क्रीडा राज्यमंत्र्यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर दरोडा, दोन जणांना मारहाण, एक लाखाची रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 00:21 IST2025-10-10T00:20:57+5:302025-10-10T00:21:24+5:30
Jalgaon Crime News: केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या रक्षा ऑटो फुएल्स या मुक्ताईनगरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला. यात दोन कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करीत तोडफोड करण्यात आली. जवळपास एक लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. ही थरारक घटना राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास घडली.

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्र्यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर दरोडा, दोन जणांना मारहाण, एक लाखाची रोकड लंपास
- विनायक वाडेकर
मुक्ताईनगर (जि.जळगाव) - केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या रक्षा ऑटो फुएल्स या मुक्ताईनगरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला. यात दोन कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करीत तोडफोड करण्यात आली. जवळपास एक लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. ही थरारक घटना राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास घडली.
प्रकाश माळी व दीपक खोसे अशी मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या पेट्रोल पंपावर दोन दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी अचानक या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांच्या डोक्याला बंदूक लावत गल्ल्यातील आणि कर्मचाऱ्यांकडे असलेली जवळपास एक लाख रुपयांची रोकड लंपास केली. तसेच ऑफिसमधील संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तोडफोड करण्यात आली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ हे पथकासह घटनास्थळी पोहचले. दरोडेखोर बोहर्डी गावाच्या दिशेने पसार झाल्याची माहिती मिळताच पोलिस पथक त्या दिशेने रवाना झाले आहे.