जिल्ह्यात लवकरच निर्बंध शिथिल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:18 IST2021-07-30T04:18:40+5:302021-07-30T04:18:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात येत्या दोन दिवसात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ...

जिल्ह्यात लवकरच निर्बंध शिथिल होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात येत्या दोन दिवसात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली. त्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात केला जाणार आहे. याबाबत शासनाचे विस्तृत आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासन कार्यवाही सुरू करेल.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली. जिल्ह्याचा गेल्या काही दिवसांमधील पॉझिटिव्हिटी रेट हा ०.१९ टक्के इतका आहे. त्यामुळे जळगावमधील निर्बंध आता हटणार आहेत. या आधी राज्य सरकारने जिल्ह्यातील निर्बंध हटवले होते; मात्र डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू केले होते. आता पुन्हा एकदा जिल्ह्यात नागरिकांना मोकळीक मिळणार आहे.
सध्या जिल्ह्यात चार वाजेपर्यंतच अत्यावश्यक आणि इतर सर्व दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचारी संख्येवर निर्बंध आहेत. हे निर्बंधदेखील या टप्प्यात शिथिल केले जाऊ शकतात. जिल्ह्यात सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेले असले तरी याबाबत अद्याप निर्णय घेतला गेलेला नाही. किंवा तसे आदेशदेखील स्थानिक जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेेले नाहीत.
काय असेल मोकळीक
दुकाने, हॉटेल्स पूर्णवेळ सुरू करण्यास मोकळीक देण्याची शक्यता
मॉल्समध्ये कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून पूर्णवेळ सुरू होण्याची शक्यता
मंदिरे सुरू होऊ शकतात
व्यायामशाळा आणि सिनेमागृहांना निर्बंधातून सुट
लग्न आणि इतर खासगी सोहळ्यांना थोडीफार सुट
जमावबंदीतून मिळण्याची शक्यता
खासगी आणि सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना उपस्थितीत सुट
कोट - निर्बंध शिथिल करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अद्याप अधिकृतरीत्या कळवलेले नाही. याचे आदेश आले की जिल्हा पातळीवर योग्य ते आदेश निर्गमित केले जातील - अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी.
कोरोनाची दुसरी लाट कमी झालेली असताना शिवाय तिसऱ्या लाटेबाबत ठोस कोणीच काही सांगत नसताना अशा स्थितीत व्यापारी वर्गाला वेठीस न धरता, ते पूर्वपदावर आणावे लागणार आहे. जळगाव शहरात रुग्णसंख्या घटली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्ण आहेत तेथे निर्बंध हवेत. शासनाने तातडीने सर्व व्यवहार पूर्वपदावर आणावे.
पुरुषोत्तम टावरी, कॅट संघटनेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष.