ममुराबाद : ममुराबाद गावाला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन जीर्ण झाली आहे. त्यामुळे नवीन पाइपलाइनचा ठराव ग्रामपंचायतीकडून करण्यात आला आहे. हा ठराव शनिवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मंजुरीसाठी देण्यात आला.
गावातील पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन ही चाळीस ते पन्नास वर्षे जुनी आहे. त्यामुळे ती जीर्ण झाली आहे. परिणामी, ठिकठिकाणी तिला गळती लागते. पाण्याची नासाडी होत असल्यामुळे नुकतेच ममुराबाद ग्रामपंचायतीने नवीन पाइपलाइन टाकण्याची मागणी पालकमंत्री यांच्याकडे केली होती. त्यानुसार, पालकमंत्री यांनी ठराव मागविला होता. तो ठराव ग्रामपंचायतीकडून शनिवारी पालकमंत्री यांना सुपुर्द करण्यात आला. त्यानंतर, पालकमंत्र्यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागातील अभियंत्याला गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्या. यावेळी ठराव देताना सरपंच हेमंत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य विलास सोनवणे, अमर पाटील, महेश चौधरी, गोपाल मोरे, अनिस पटेल, नासिर शेख आदींची उपस्थिती होती.