लाेकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या लसींना मान्यता मिळत असतानाच जिल्ह्यातही या लसीकरणाबाबत नियोजन करण्यात येत आहे. शासकीय आणि खासगी यंत्रणेतील सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली असून, प्रशिक्षणही झालेले असून, आता लस आल्यानंतर लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यात खासगी डॉक्टरही लस आली आणि ती निकष पूर्ण केल्यानंतर आम्ही घेऊच, असे मत व्यक्त केले आहे.
जिल्ह्यात १९ हजार ७३५ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी नोंदणी झालेली आहे. दरम्यान, ही लस साठवणुकीसाठी आता शहरात दोन मोठे फ्रीजही दाखल झाले आहेत. यात साधारण ५०० लिटर लस साठवणुकीची क्षमता आहे. अशाच प्रकारे आरोग्य केंद्रांमध्येही लस साठवणुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच हे लसीकरणाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, सुरुवातीच्या काळात शासकीय यंत्रणेतील आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झपाट्याने झालेली होती. मात्र, खासगी यंत्रणेतील डॉक्टरांकडून प्रतिसाद मिळत नव्हता, अनेक दिवस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आल्यानंतर, बैठक झाल्यानंतर हळूहळू सर्वांनी लस घेण्यासाठी नोंदणी केल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. यात मात्र, लस नेमकी कोणती येणार एका व्यक्तीला किती डोस द्यावे लागणार अशा अनेक बाबी अस्पष्ट असून, जेवढ्या या बाबी लवकर स्पष्ट होतील तेवढे चांगले, असेही डॉक्टर सांगत आहेत.
चौकट
डॉक्टर, कर्मचाऱ्यांची काय भावना
लस नेमकी कोणती? येणार यावर सर्व स्पष्ट होणार आहे. ते निश्चित झाल्यानंतर आणि सर्व निकष पूर्ण असतील तर लस घ्यायला काहीच हरकत नाही. जर कोरोनाशी थेट लढताना त्याचा उपयोग होत असेल तर लस घ्यायला तयार असल्याची भूमिका आरोग्य कर्मचाऱ्यांनी मांडली आहे. मात्र, लस नेमकी कोणती? हा प्रश्न मांडला आहे.
कोट
खासगी डॉक्टरही कोरोनाच्या काळात थेट लढले आहेत. कोरोनाच्या काळात सेवा दिली आहे. लसीबाबत नोंदणी झालेली आहे. मात्र, लस नेमकी कोणती येणार हे स्पष्ट नाही. मध्यंतरी जिल्ह्यात एक बैठक झाली, मात्र, नंतर झालेली नाही. कोरोनात काम करताना धोका आहेच त्यामुळे खासगी डॉक्टर लस घेतील.
- डॉ. स्नेहल फेगडे, सचिव, आयएमए
कोट
जिल्ह्यातील सर्व खासगी आणि शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीसाठी नोंदणी पूर्ण झालेली आहे. आपण तशी माहितीही शासनाकडे पाठविली आहे. मध्यंतरी खासगीकडून नोंदणी होण्यास उशीर झाला होता. त्यांना आवाहन करून ती नोंदणी पूर्ण झाली. जिल्ह्यात सर्व नियोजन झाले असून, लस आल्यावर लसीकर सुरू होईल. -
- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक