राम मंदिराच्या नावाने बनावट पावती पुस्तक छापून वसुली, एकाला पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 20:21 IST2021-02-18T20:20:36+5:302021-02-18T20:21:23+5:30
बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेकडून भांडाफोड

राम मंदिराच्या नावाने बनावट पावती पुस्तक छापून वसुली, एकाला पकडले
जळगाव : राम मंदिर उभारणीसाठी बनावट पावती पुस्तक छापून देणगी वसूल करणाऱ्या राजेंद्र भास्करराव सोनवणे (४७,रा.चाळीसगाव घाट) याला गुरुवारी दुपारी गोलाणी मार्केट परिसरात पकडण्यात आले. बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हा भांडाफोड केला असून सोनवणे याला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
साईचैतन्य बहुउद्देशीय संस्था व विश्व हिंदू परिषद द्वारा संचलित जळगाव या नावाने पावती पुस्तक तयार करण्यात आले असून त्यावर १४ फेब्रुवारी ते १४ एप्रिल २०२१ विधी समर्पण अभियान असा उल्लेख छापण्यात आलेला आहे. हे पावती पुस्तक हस्तगत करण्यात आले असून त्यावर ४००, ५० व १० रुपयाच्या पाच पावत्या फाडण्यात आलेल्या आहेत. गोलाणी मार्केटमध्ये दुपारी तीन वाजता सोनवणे पावत्या फाडत असल्याचे काही संघटनांच्या प्रतिनिधींच्या लक्षात आले. बजरंग दलाचे जिल्हा संयोजक राकेश कांतीलाल लोहार,राजेंद्र देविदास नन्नवरे व देवेंद्र दुर्गादास भावसार व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेऊन राजेंद्र सोनवणे याची चौकशी केली असता सर्वच प्रकार संशयास्पद वाटला. राम मंदिर बांधकामाच्या नावाने तो लोकांची फसवणू करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन थेट शहर पोलीस ठाण्यात आणले.
देणगीसाठी समिती गठीत
अयोध्या येथे राम मंदिर उभारण्यासाठी निधी संकलित केला जात आहे. त्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र कॅम्प कार्यालय, राजकोट, अयोध्या यांच्या नावाने १०० रुपयांची पावती फाडली जात आहे. त्याव्यतिरिक्त कोणाला वेगळी किंवा जास्त रक्कम द्यावयाची असल्यास वेगळी पावती असते.जळगाव शहरात श्रीराम मंदिर निधी समर्पण समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमार्फतच देणगी स्विकारुन ती अयोध्या येथील राम मंदिराच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यासाठी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी अशी मोहीम आहे. राजेंद्र सोनवणे याच्याकडील पावती पुस्तकातच तफावत आहे.राकेश कांतीलाल लोहार यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.