सक्षम युवा पिढीसाठी वाचन संस्कृती रुजणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 07:32 PM2019-10-01T19:32:50+5:302019-10-01T19:41:13+5:30

डॉ. आशुतोष पाटील : मू़जे़ महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शन

 Reading culture is essential for a capable young generation | सक्षम युवा पिढीसाठी वाचन संस्कृती रुजणे आवश्यक

सक्षम युवा पिढीसाठी वाचन संस्कृती रुजणे आवश्यक

Next

जळगाव : जग बघण्यासाठी आणि सक्षम युवा पिढी घडण्यासाठी समाजात वाचन संस्कृती रुजणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. आशुतोष पाटील यांनी केले.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा-जळगाव व मू़जे़ महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने केसीई सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पुस्तक प्रदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यावेळी केसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, युवराज माळी आदींची उपस्थिती होती़

आशुतोष पाटील पुढे म्हणाले की, वाचनाने व्यक्तिमत्व विकासाबरोबरच दैनंदिन जीवनात आत्मभान आणि जीवनभान येते. हृदय, हात व मेंदुचा विकास होण्यासाठी वाचन आवश्यक आहे़ तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृतीचे स्वरूप हे बदलले असून युवा पिढीवर फार मोठी जबाबदारी आहे़ तर प्रकाशक सुध्दा व्यवसाय म्हणून का होईना़ मात्र, वाचन संस्कृती वाढविण्यासाठी नेहमीच कार्य करित असतात़ तसेच ज्ञानसंपन्न होण्यासाठी श्रवण आणि वाचन महत्वाचे आहे़ त्यामुळे प्रेम करायचे असेल तर ते पुस्तकांवर करा, असे मत सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले़ सूत्रसंचालन डॉ. अतुल पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ़ उदय कुळकर्णी यांनी केले़

व्यक्त होण्याचं सोशल मीडिया मोठं साधन !
प्रदर्शनाच्या उद्घाटन सत्रानंतर ‘सोशल मिडिया : वाचनाचे नवे आयाम’ या विषावर दुसरे सत्र पार पडले़ त्यावेळी व्यासपीठावर लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व मू़जे़ महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे डॉ़ पंडित चव्हाण यांची उपस्थिती होती़ त्यावेळी वाचनाची गोडी निर्माण झाली की, आपण हळूहळू पुस्तकाकडे वळतो़ दरम्यान, विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या पलीकडे जाऊन वाचन करणे आवश्यक आहे़ आधी व्यक्त होण्यासाठी मर्यादीत साधने होती़ आज सोशल मीडियामुळे व्यक्त होणे सोपं झालेले आहे, असे मत मिलिंद कुलकर्णी यांनी मांडले़ सोशल मीडियावर आलेल्या पोस्टचे समर्थन कराल किंवा त्यावर मत मांडाल तर त्यासाठी अभ्यासूपणा असायला हवा़ तरचं त्या मताला महत्व असते़ आज तर मला जेवढे हवे आहेत़़़मला जेवढे आवडतील किंवा पुरक ठरतील तेवढेच महापुरूष माझे, असे झाले असून मात्र, महापुरषांचा संपूर्ण अभ्यास असायला हवा़ जर अभ्यास नसेल तर मुद्दा मांडत असताना आपण उघडे पडतो असेही त्यांनी सांगितले़

वाचन संस्कृतीत बदल़़
वाचन संस्कृती ही लयाला चालली नसून त्यात फक्त बदल होत चालला आहे़ तंत्रज्ञामुळे वाचकाला चॉईस मिळाली असून तो विविध भाषांमध्ये वाचन करित आहे़ त्यामुळे सोशल मीडियाचा वाचन संस्कृतीवर कुठलाही फरक पडत नाही़ उलट पुस्तके घरा-घरात पोहोचली़ मी डिजीटल माध्यमाचा वापर करून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलो असे, प्रा़ पंडित चव्हाण यांनी मत व्यक्त करताना सांगितले़

प्रदर्शनात ७५ प्रकाशकांची पुस्तके
या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध ७५ नामवंत प्रकाशकांची पुस्तके लावण्यात आली आहेत. प्रदर्शनानिमित्त मू़जे़ महाविद्यालयात साहित्यिक उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. यावेळी डॉ. किसन पाटील, चंद्रकांत भंडारी, डॉ. सी. पी. लभाणे, डॉ. अनिल क्षीरसागर, डॉ. एल. पी. वाघ, डॉ. सविता नंदनवार, सुखदेव वाघ उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रा. योगेश महाले, प्रा. गोपिचंद धनगर, प्रा. दीनानाथ पाठक, प्रा. अजित पाटील यांनी परिश्रम घेतले.

 

 

Web Title:  Reading culture is essential for a capable young generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.