पक्ष्यांचीही निवडणूक घेणारे गाडगीळ दाम्पत्य, पक्षी संवर्धन झाला जीवनाचा ध्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 13:57 IST2025-04-13T13:50:25+5:302025-04-13T13:57:51+5:30

जळगावचे राजेंद्र आणि शिल्पा हे गाडगीळ दाम्पत्य पक्षी जगताविषयीचे समज-गैरसमज, तत्संबंधीच्या अंधश्रद्धा याबाबत जागृतीसाठी सतत ठिकठिकाणी शिबिरे, स्लाइड्स शो, पोस्टर प्रदर्शने भरवतात. पक्षी जगताचे जतन-संवर्धन हा त्या दोघांच्या जीवनाचा ध्यास झाला आहे.

Rajendra gadgil shilpa gadgil, a couple who also take elections for birds what is ebird | पक्ष्यांचीही निवडणूक घेणारे गाडगीळ दाम्पत्य, पक्षी संवर्धन झाला जीवनाचा ध्यास

पक्ष्यांचीही निवडणूक घेणारे गाडगीळ दाम्पत्य, पक्षी संवर्धन झाला जीवनाचा ध्यास

जळगावचे राजेंद्र गाडगीळ यांनी वयाच्या विशीत असताना, १९७०च्या दशकात जे व्रत घेतले, ते त्यांनी पन्नास वर्षांनंतर, आजही सोडलेले नाही. उलट, ते ध्येय विस्तारले. विशेष म्हणजे पत्नी शिल्पासुद्धा या कार्यात सहभागी झाली. आता, दोघे मिळून पक्षी निरीक्षण आणि अभ्यास या क्षेत्रात ‘सिटीझन सायंटिस्ट’ म्हणून महाराष्ट्रात नंबर एकच्या स्थानी आहेत! 

राजेंद्र यांनी आणीबाणीविरुद्ध लढताना कॉलेज शिक्षणावर बहिष्कार घातला. त्या आंदोलनातील सहभागानंतर ते १९८०च्या दशकात विज्ञानजागृतीकडे वळले. त्यांनी अब्राहम कोवूर यांचे अंधश्रद्धाविरोधी विचार रोज चौकातील फलकावर लिहून विज्ञान प्रचार, प्रसार सुरू केला. त्याच सुमारास १९८०पासून त्यांनी ‘लोकविज्ञान संघटने’त संस्थापक सदस्य म्हणून स्वयंसेवी कार्यासही वाहून घेतले. त्यांनी विज्ञान लोकांसाठी या अंगाने विविध विषयांवर जागरणाचे कार्यक्रम केले.

ती चळवळ थंडावली तेव्हा २०१० साली त्यांनी मार्ग थोडा बदलला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पक्षीमित्र संमेलन भरले होते. पक्ष्यांबद्दलचे मूळ औत्सुक्य शिल्पाचे. राजेंद्र यांनीही शिल्पा यांच्याबरोबर संमेलनात भाग घेतला. तेव्हापासून दोघांना पक्षी निरीक्षणाचा व अभ्यासाचा छंद जडला! 

त्यांची भटकंती अभयारण्य, नदी-खाडी-तलाव अशा विविध ठिकाणी सुरू झाली, मात्र त्यांनी त्यांचे मुख्य उद्दिष्ट जळगाव शहरातील पक्षीजीवनाचा अभ्यास हे ठरवले. त्यांनी जळगाव शहर परिसराचे कानळदा रोड, हनुमान खोरे, लांडोर खोरे, मेहरूण तलाव असे चौदा भाग (ग्रीड) पाडून घेतले. ते तेथे पक्ष्यांच्या नोंदी नियमित करत असतात. पंधरा वर्षांत त्यांनी स्थानिक आणि स्थलांतर करून येणाऱ्या दोनशेएकावन्न पक्ष्यांच्या जातींची नोंद केली आणि एकशेचाळीसच्यावर पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड केले आहेत. शिल्पा गाडगीळ यांनी बीएनएचएस (मुंबई)चा ऑर्निथॉलॉजी हा अभ्यासक्रम केला आहे. त्या दोघांनी पक्ष्यांच्या आवाजाचा अभ्यास व रेकॉर्डिंग याविषयीचे प्रशिक्षण सांगलीच्या आपटे यांच्याकडे घेतले आहे.

त्यांनी स्वतःला ‘ई-बर्ड’ या जागतिक संस्थेशी जोडून घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या निरीक्षणात व अभ्यासात शिस्त आली, ज्ञानविस्तार झाला. गाडगीळ दाम्पत्य पक्षी जगताविषयीचे समज-गैरसमज, तत्संबंधीच्या अंधश्रद्धा याबाबत जागृतीसाठी सतत ठिकठिकाणी शिबिरे, स्लाईड्स शो, पोस्टर प्रदर्शने भरवतात. पक्षी जगताचे जतन-संवर्धन हा त्या दोघांच्या जीवनाचा ध्यास झाला आहे.

त्यांनी कोविड काळात महाराष्ट्रव्यापी ऑनलाइन प्रश्नमंजूषा घेतल्या. त्यांची आगळीवेगळी मौज म्हणजे त्यांनी ‘जळगाव शहर पक्षी’ निवडणूक घेतली. लोकांनी शहर पक्षी म्हणून पांढऱ्या छातीचा धीवर (खंड्या) या पक्ष्याची निवड केली. राजेंद्र व शिल्पा यांना मराठी विज्ञान परिषद (जळगाव), सप्तरंग महाराष्ट्र चॅनेल, कोकणातील सृष्टिज्ञान, सह्याद्री संकल्प सोसायटी, आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज (देवरूख) यांनी पुरस्कार दिले आहेत. ते म्हणतात, की निसर्ग आणि मानव यांच्यातील समतोल सांभाळणारी पर्यायी विकास नीती हीच सृष्टी व मनुष्य जीवन जगऊ शकेल.

Web Title: Rajendra gadgil shilpa gadgil, a couple who also take elections for birds what is ebird

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.