भडगाव शेतकरी संघात मका मोजणीसाठी वाहनांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 23:54 IST2021-04-08T23:53:27+5:302021-04-08T23:54:07+5:30
शेतकरी सहकारी संघाच्या आवारात सुरु झालेल्या ९३५ ऑनलाईन नोंदणीपैकी एकूण ३४६ शेतकऱ्यांचा हरभरा माल मोजण्यात आला आहे.

भडगाव शेतकरी संघात मका मोजणीसाठी वाहनांच्या रांगा
लोकमत न्यूज नेटवर्क
भडगाव : शासकीय हरभरा खरेदी केंद्र, भडगाव येथील शेतकरी सहकारी संघाच्या आवारात सुरु झाले आहे. ९३५ ऑनलाईन नोंदणीपैकी एकूण ३४६ शेतकऱ्यांचा हरभरा माल मोजण्यात आला आहे. उर्वरित हरभरा माल मोजणी टोकनप्रमाणे सुरु आहे. हरभरा तसेच मका माल मोजणीसाठी शेतकरी संघाच्या आवारात वाहनांच्या रांगा लागत आहेत. शेतकऱ्यांची मोठी झुंबड उडत आहे.
हरभरा, मका, ज्वारी, गहू नोंदणीही ऑनलाईन सुरु आहे. तरी भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी हरभरा, ज्वारी, गहू, मका नोदणी तत्काळ करावी, असे आवाहन भडगाव शेतकरी संघाचे चेअरमन प्रताप पाटील यांनी केले आहे.
शासकीय हरभरा खरेदी केंद्राची खरेदी दिनांक १७ मार्चपासून सुरु झाली आहे. ही मोजणी, खरेदी भडगाव येथील शेतकरी सहकारी संघाच्या आवारात सुरु आहे. हरभरा धान्याला शासकीय हमी भाव प्रति क्विंटल ५१०० रुपयांपर्यंत जाहीर करण्यात आला आहे. यासाठी एकूण ९३५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. ९३५ पैकी एकूण ३४६ शेतकऱ्यांचा हरभरा माल दिनांक ६ पर्यंत शेतकरी सहकारी संघात मोजणी करण्यात आला आहे.आतापर्यंत हा हरभरा माल एकूण ४२०३.५० क्विंटल मोजून खरेदी करण्यात आला आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना टोकन देऊन हरभरा मोजणी केला जात आहे. तालुक्यातील ऑनलाइन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचाच हरभरा माल मोजला जात आहे. भडगाव तालुक्यात उत्राण, ता. एरंडोल हे गावही हरभरा मोजणीसाठी जोडण्यात आले आहे. हरभरा माल मोजणीसाठी शेतकरी रात्रंदिवस थांबलेले दिसत आहेत.