बिलांमध्ये त्रुटी न काढण्यासाठी दबाव ; कॅफोंचा तडकाफडकी ‘प्रभारी’पदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:18 IST2021-07-30T04:18:42+5:302021-07-30T04:18:42+5:30
जळगाव : कुलसचिवांपाठोपाठ बुधवारी वित्त व लेखा अधिकारी डॉ.सोमनाथ गोहिल यांनी 'प्रभारी' पदाचा राजीनामा दिल्यानंतर विद्यापीठात एकच खळबळ उडाली ...

बिलांमध्ये त्रुटी न काढण्यासाठी दबाव ; कॅफोंचा तडकाफडकी ‘प्रभारी’पदाचा राजीनामा
जळगाव : कुलसचिवांपाठोपाठ बुधवारी वित्त व लेखा अधिकारी डॉ.सोमनाथ गोहिल यांनी 'प्रभारी' पदाचा राजीनामा दिल्यानंतर विद्यापीठात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, गोपनीय कामकाजांच्या बिलांमध्ये त्रुटी काढू नये यासाठी वरिष्ठांकडून दबाव टाकला जात असल्यामुळे डॉ.गोहिल यांनी 'प्रभारी' पदाचा राजीनामा दिला असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
व्यवस्थापन परिषदेची बैठक बुधवारी विद्यापीठात प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत परीक्षा विभागातील गोपनीय कामकाजांच्या बिलांच्या संदर्भात मुद्दा मांडण्यात आला. त्यात गोपनीय कामकाजांच्या बिलांना कुलगुरूंची मान्यता असताना, सुध्दा प्रभारी वित्त व लेखा अधिकारी यांच्याकडून त्रुटी काढली जाते, हे योग्य आहे का? अशी विचारणा कुलगुरूंनी व्यवस्थापन परिषदेत केली. त्यानंतर डॉ.गोहिल यांनी बाजू मांडून ज्याठिकाणी विद्यापीठाचा अधिकचा पैसा जात असेल तर कायद्यानुसार सल्ला देणे काम आहे व त्रुटी असेल तर काढणे गरजेचे आहे, असे सांगितले. त्यानंतर बैठकीतील वातावरण तापल्यानंतर चुकीच्या पध्दतीने काम करता येत नसल्याचे सांगत, डॉ.गोहिल यांनी तडकाफडकी 'प्रभारी' पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
कायद्यानुसार कुलगुरूंना बिलांना मान्यता देण्याचा अधिकार दिला आहे, असे व्यवस्थापन परिषदेकडून गोहिल यांना समजवून सांगण्यात आले. बिलांमध्ये काय योग्य आहे आणि काय चुकीचे हे कळते, त्यामुळे कुलगुरूंकडून आलेली बिले ही अदा करण्यात यावी. त्या बिलांवर कुठलीही कॉमेंट लिहिण्याचा अधिकार नाही असे बैठकीत त्यांना सांगण्यात आले. मात्र, त्यांनी आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले व नंतर राजीनामा दिला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांनी गोपनीय माहिती लिक केली होती ते योग्य नाही.
- प्रा.ई.वायुनंदन, प्रभारी कुलगुरू, विद्यापीठ
अधिकारी कुणाच्या दबावाला बळी पडताय, खुलासा द्या
सध्या विद्यापीठात राजीनामा सत्र सुरू आहे. बुधवारी विद्यापीठातील वित्त लेखा अधिकारी सोमनाथ गोहिल यांनी प्रभारी पदाचा राजीनामा कुलगुरूंकडे दिला. मात्र, उत्तर पत्रिकाच्या मोठ्या प्रमाणातील खर्चास मंजुरीला विरोध केल्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला गेला या दिला गेला याचा व विद्यापीठातील अधिकारी कुणाच्या दबावाला बळी पडून राजीनामा देताय याचा खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर सचिव ॲड. कुणाल पवार यांनी केली आहे. तसेच संशयित असलेले बिले काढण्यात येऊ नये अन्यथा आंदोलन केले जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे.