कळमसरे-शहापूर रस्ता न झाल्यास मतदानावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 21:15 IST2018-11-18T21:13:57+5:302018-11-18T21:15:24+5:30
ब्रिटीशकालिन कळमसरे-शहापूर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने नागरिकांना चार किलोमिटर अंतरावरील वासरे मार्गे शहापूर या समांतर वळण मार्गाचा वापर करावा लागत आहे.

कळमसरे-शहापूर रस्ता न झाल्यास मतदानावर बहिष्कार
कळमसरे, ता.अमळनेर : ब्रिटीशकालिन कळमसरे-शहापूर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने नागरिकांना चार किलोमिटर अंतरावरील वासरे मार्गे शहापूर या समांतर वळण मार्गाचा वापर करावा लागत आहे. या रस्त्यासाठी वारंवार निवेदन, मोर्चा व उपोषण केल्यानंतरही प्रशासनाकडून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येत नसल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
कळमसरे - शहापूर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पूर्वीचा १२ फुटाचा हा रस्ता जेमतेम ५ फुट शिल्लक राहिला आहे. आजूबाजूला निसटत्या, खोल खाच खडग्यात गेलेला, काटेरी झुडूपांनी व्यापलेल्या या पाच कि.मि.रस्त्यावर जीव मुठीत धरूनच वाहन चालवावे लागते. एस.टी.महामंडळाची बस पलटी होइल या भीतीने प्रवासी आसनाला घट्ट धरून असतात. जि.प.बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्यावर प्रत्येक निवडणूकीच्या तोंडावर खडीचे ढीग पडतात. खडीचे मातीत रूपांतर होईपर्यत कामाला सुरूवात होत नाही. सलग पाच कि.मि.चा हा रस्ता एकाच वेळी पुर्ण करत नाहीत. कधी कळमसरे गावाकडून तर कधी शहापूर गावाकडून फक्त १ ते दीड किलोमिटर काम करण्यात येत असते. तो पर्यत तयार झालेला रस्ता खड्डेमय होत असल्याची खंत शहापूरचे माजी सरपंच मुरलीधर पाटील यांनी व्यक्त केली.