जळगाव : मी पोलीस आहे, इतक्या रात्री तू बाथरुमध्ये काय करतोय, तुझा मोबाईल दाखव असा दम देऊन इब्रान अब्दुल करीम बागवान (३०,रा.जोशी पेठ) या तरुणाचा मोबाईल दोन जणांनी लांबविल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजता जुने बी. जे. मार्केटच्या दुसऱ्या मजल्यावर घडली. याप्रकरणी बुधवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
इब्रान हा मंगळवारी रात्री ९ वाजता जेवण झाल्यानंतर जी.एस.ग्राऊंडकडे फिरायला आला होता. बी.जे.मार्केटमध्ये बॅनरचे काम करणाऱ्या मित्राला भेटायचे असल्याने तो १० वाजता तेथे गेला. बालगंधर्व सभागृहाच्या दिशेने मार्केटच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरुमध्ये लघुशंकेसाठी गेला. तेथून बाहेर येताच दुसऱ्या बाथरुममधून एक जण बाहेर आला व दुसरा बाहेर उभा होता. त्याची पोलिसासारखी हेअरस्टाईल होती. त्यातील एकाने ‘मी पोलीस आहे तू इतक्या रात्री बाथरुममध्ये काय करतो आहे’ म्हणून तरुणाला विचारणा करत त्याच्याजवळील मोबाईल घेऊन त्यातील सीम कार्ड काढायला लावले. इब्रान याने तसे करून मोबाईल त्याच्या हातात दिला व त्यानंतर दोघेजण निघून गेले.