जळगाव : रविवारची वेळ सकाळी साडेदहा वाजेची... तालुका पोलीस ठाण्याचे वारंट ड्यूटीचे हवालदार श्यामकांत बोरसे दुचाकीने पोलीस ठाण्यात जात असताना एक महिला दोन लहान मुलींना घेऊन घाबरलेल्या अवस्थेत रेल्वे गेटच्या रस्त्याने धावत सुटली... मिनिटा मिनिटाला ती मागे वळून पाहत होती... काय झालं असावं म्हणून बोरसेंनाही प्रश्न पडला. त्यांनी पुढे जाऊन पाहिले तर एक पुरुष रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर तेथेच एका मुलाच्या हातात चॉपर तर दुसऱ्याच्या हातात दांडकं होतं... बोरसेंनी क्षणाचाही विलंब न करता समयसूचकता दाखवत दुचाकीच्या डिक्कीतून बेड्या काढल्या अन् दोन्ही मुलांच्या हातात टाकून पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली.
या घटनेबाबत श्यामकांत बोरसे यांनी ‘लोकमत’ला घटनाक्रम सांगितला, निमखेडी शिवारात मुलांनीच बापाचा (प्रेमसिंग अभयसिंग राठोड) खून केला हे आपल्याला माहिती नव्हते. नेहमीप्रमाणे साध्या गणवेशात पोलीस ठाण्यात जात असताना एक महिला प्रचंड घाबरलेली व दोन्ही मुलांना घेऊन धावत असल्याचे दृश्य नजरेस पडले. ती सारखी सारखी मागे वळून पाहत होती. नक्कीच काही तरी गडबड असावी म्हणून ती ज्या रस्त्याने आली तिकडे काय आहे म्हणून नजर टाकली असता काही अंतरावर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.
एकाच्या हातात दांडकं, दुसऱ्याच्या हातात चॉपर
घटनास्थळावर तेथे एका मुलाने बोरसे यांच्या डोळ्यासमोर दांडकं बाजूला फेकले, तर दुसऱ्याने चॉपर फेकला. येथे खून झाल्याची खात्री पटली. दोन्ही मुले एक तर पळून जातील किंवा संतापाच्या भरात ते आईवर देखील वार करतील, अशी शंका मनात आली. त्यामुळे कुठलाच विचार न करता तातडीने दुचाकीच्या डिक्कीतून बेड्या काढल्या आणि दोन्ही मुलांच्या (गोपाल व दीपक) हातात त्या अडकविल्या. बेड्या पाहून या दोघांना आपण पोलीस असल्याची खात्री पटली. त्यामुळे त्यांनी कुठलीच हालचाल केली नाही. बोरसे यांनी लगेच तालुका पोलीस ठाण्यात घटनेची माहिती कळविली. पोलीस वाहनदेखील अवघ्या काही मिनिटांतच पोहोचले. या दोघं मुलांना घेऊन तातडीने पोलीस ठाण्यात हलविले. नंतर प्रेमसिंग राठोड याची पत्नी बसंती, मुलगी शिवानी व कविता या तिघांना बोरसे यांनी समयसूचकता दाखविली नसती तर कदाचित दोन्ही मुले फरार झाली असती किंवा दुसरी काही घटना घडली असती. दोन्ही मुलांच्या ताकदीपुढे बोरसे कमी पडले होते. त्यात बोरसे यांच्यावर देखील हल्ला होण्याची भीती होती. मात्र, त्यांनी जिवाची पर्वा न करता आरोपींना पकडून ठेवल्याने त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.