काशिनाथ चौकात खड्ड्यांमुळे होतेय कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:42 IST2020-08-31T11:40:22+5:302020-08-31T11:42:03+5:30
रस्त्यात पडले मोठमोठे खड्डे : भाजीविक्रेत्यांनीही केले अतिक्रमण, वाहनचालकांना करावा लागतो वाहतुक कोंडीचा सामना

काशिनाथ चौकात खड्ड्यांमुळे होतेय कोंडी
जळगाव : अजिंठा चौफुलीकडून औरंगाबादकडे जाणारा रस्ता अनेक समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे बाजार समितीजवळच्या काशिनाथ चौकातच पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहने संथ गतीने जातात. काही मोठी वाहने या खड्ड्यांमध्येच अडकतात. तर भाजी विक्रेत्यांनी या रस्त्यावर दुतर्फा ठाण मांडले आहे. त्यामुळे देखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले. त्यात बळिराम पेठ आणि इतर भागातील भाजी बाजार हटवण्यात आला. काही भाजी विक्रेत्यांना इतर ठिकाणी भाजी विक्रीला परवानगी देण्यात आली. या काळात रोजगार गेलेल्या अनेकांनी भाजी आणि फळे विक्रीच्या गाड्या लावून आपल्या रोजगाराची सोय केली.
पण हे करताना अनेकांनी या महत्त्वाच्या राज्य मार्गावर हातगाड्या लावल्या. अनेक जण येथे फळे आणि भाज्या घेण्यासाठी वाहने थांबवतात. त्यातच काही ठिकाणी साईडपट्ट्या खोल असल्याने वाहने भररस्त्यातच थांबवली जातात.
भाजी विक्रेत्यांनी अजिंठा चौफुलीपासून ते काशिनाथ चौकाच्या पुढपर्यंतच्या रस्त्यावर हातगाड्या आणि मोठमोठी दुकाने थाटायला सुरूवात केली आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. शुक्रवार आणि शनिवार या शहरात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे या मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. आणि चिखलही झाला होता. या चिखलात दुचाकी देखील अडकल्या होत्या. शहरातून औद्योगिक वसाहत, पुढे अजिंठा आणि औरंगाबादला जोडणारा हा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर अहोरात्र वाहतुक सुरु असते. या भागातून मोठमोठे टँकर, ट्रक, जात असतात. रात्री जामनेर, सोयगाव या तालुक्यांमधून शेतकरी मालाच्या गाड्या घेऊन येतात. त्यामुळे या रस्त्यावर खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही
नुसतेच खड्डे
कशिनाथ चौकाकडून मेहरुणकडे जाणारा रस्ता हा कायमस्वरुपी समस्यांच्या गर्तेत असतो. स्थानिक नगरसेवक आणि मनपा प्रशासन याकडे लक्ष देत नाही. पाऊस पडल्यावर येथे रस्ताच दिसत नाही. नुसतेच खड्डे दिसून येतात. त्यामुळे या परिसरातील नागरिक वैतागले आहे. त्यातच बाजार समितीच्या व्यापारी संकुलाच्या बाजुला फळविक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहनधारक वैतागले आहे.
रात्रीचा प्रवास जीव मुठीत धरून
या भागातून औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार रात्री अपरात्री सायकल, दुचाकीने प्रवास करत असतात. त्यात अनेकदा पथदिवे बंद असतात. मोठमोठे खड्डे, खोल गेलेल्या साईडपट्ट्या,चिखलामुळे निसरडे झालेले रस्ते यामुळे हा अजिंठा चौफुलीपर्यंतचा प्रवास जीव मुठीत घेऊन करावा लागतो.