Parola police caught the two-wheeler thieves | दुचाकी चोरट्यांना पारोळा पोलिसांनी पकडले

दुचाकी चोरट्यांना पारोळा पोलिसांनी पकडले

ठळक मुद्देपाठलाग करून आवळल्या मुसक्या.

लोकमत न्यूज नेटवर्क

पारोळा :  कासार गणपती चौकात चोरीच्या गाड्या सोडून चोरटे निघून गेले. त्यांनी चोरलेल्या गाड्या सोडल्यानंतर पोलीस, होमगार्ड यांनी त्यांचा पाठलाग करून कुटीर रुग्णालयाच्या कासोदा रस्त्यासमोरील गेटजवळ पकडले.

यावेळी हेडकॉन्स्टेबल सुधीर चौधरी, पोलीस गाडीचालक सागर कासार यासह होमगार्ड हिरालाल भोई, दीपक पाटील, सुरेश भोई, सचिन पाटील, आशिष पाटील, योगेश मराठे, ईश्वर पाटील, मायाराम पाटील हे गस्त घालत होते. रविवारी दोन मोटारसायकल चोरी झाल्या होत्या. त्यातील एक मोटारसायकल (एमएच-१९-डीसी-९०६४) ज्ञानेश्वर मराठे यांनी रात्री घरी लॉक करून लावलेली होती. तेव्हा चोरट्यांनी गाडी चोरली. ती सुरू होत नसल्यामूळे कासार गणपती चौकापर्यंत लोटत नेऊन त्याठिकाणी चालू करण्याच्या प्रयत्नात असताना पोलीस आल्यानंतर त्यांनी पळ काढला. त्या दरम्यान त्यांनी राहुल मिसर यांचीही मोटारसायकल (एमएच-१९-बीके-३४७७) ही लांबवली होती, तर शनिवारी रात्री गारवा हॉटेल भोकरबारी, ता. पारोळा येथून किरण लोटन पाटील यांची ही मोटारसायकल (एमएच-१९-डीएन-६९०४) ही चोरीस गेलेली आहे. पोलीस गस्त घालत असताना मयूर संजय सोनवणे (वय २३), दिगंबर रवींद्र सोनवणे (वय २१), धीरज सुनील सोनवणे (वय २२) सर्व राहणार भोकर, ता.जळगाव या संशयितांना चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले आहे.

यापूर्वी चोरीस गेलेल्या १५-२० दुचाकींचाही तपास करावा..

या चोरट्यांकडून गेल्या महिनाभरात चोरीस गेलेल्या पंधरा ते वीस मोटारसायकलीसह यापूर्वीही चोरी झालेल्या मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत कराव्यात, अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांच्यासह शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कांनडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापूराव पाटील,प्रवीण पाटील हे करीत आहेत. दरम्यान, मोटारसायकल चोरटे सापडताच अमळनेर उपविभागीय पोलीस अधीक्षक राकेश जाधव यांनी पारोळा येथे भेट देत संशयित चोरट्यांची परेड घेतली.

Web Title: Parola police caught the two-wheeler thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.