जळगावात ‘लोटस’चेच ‘ऑपरेशन’, शिवसेनेचा महापौर; २७ नगरसेवक फुटले भाजपची सत्ता गेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 06:43 IST2021-03-19T02:39:07+5:302021-03-19T06:43:14+5:30
या निवडणुकीत भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने व एमआयएमच्या ३ नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेला बहुमतापेक्षाही जास्त मते मिळाली. काही दिवसांपूर्वी सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसने ‘ऑपरेशन लोटस्’ यशस्वी करत भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली.

जळगावात ‘लोटस’चेच ‘ऑपरेशन’, शिवसेनेचा महापौर; २७ नगरसेवक फुटले भाजपची सत्ता गेली
जळगाव: भारतीय जनता पक्षाचे तब्बल २७ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेने जळगाव महापालिकेत सांगली पॅटर्नच्या धर्तीवर सत्तांतर घडवून आणले. महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव केला, तर उपमहापौरपदी भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील विजयी झाले. भाजपचे उमेदवार सुरेश सोनवणे यांचा त्यांनी १५ मतांनी पराभव केला.
या निवडणुकीत भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने व एमआयएमच्या ३ नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेला बहुमतापेक्षाही जास्त मते मिळाली. काही दिवसांपूर्वी सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसने ‘ऑपरेशन लोटस्’ यशस्वी करत भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली. त्याचीच पुनर्रावृत्ती जळगावात झाली. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने ७५ पैकी ५७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले होते. मात्र, अडीच वर्षांतच भाजपला महापालिकेतील सत्ता गमवावी लागली आहे. आ. सुरेश भोळे यांच्याविरुद्ध असलेली नाराजी, भाजपकडून देण्यात आलेल्या उपमहापौर पदाच्या उमेदवाराला असलेला विरोध यामुळे भाजपचे तब्बल २७ नगरसेवक शिवसेनेला जाऊन मिळाले. त्यानुसार गुरुवारी झालेल्या ऑनलाइन निवडणुकीत शिवसेनेने यश मिळवले.
भाजप सुप्रीम कोर्टात जाणार -
महापौर, उपमहापौर निवडप्रसंगी शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्या अर्जाला भाजपकडून हरकत घेण्यात आली. पीठासन अधिकाऱ्यांनी भाजपची हरकत फेटाळून लावत अर्ज वैध ठरवला. पीठासन अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा भाजपने दिला.