PFI शी संबंधित आणखी एकाला अटक, जळगावातून पहाटेच उचलले
By सुनील पाटील | Updated: September 27, 2022 13:48 IST2022-09-27T13:46:34+5:302022-09-27T13:48:02+5:30
पहाटे साडे तीन वाजता छापा : एटीसी व पोलिसांची कारवाई

PFI शी संबंधित आणखी एकाला अटक, जळगावातून पहाटेच उचलले
जळगाव : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेशी संबंधित उनैस उमर खय्याम पटेल (वय ३१, रा.अक्सा नगर, जळगाव) याला पहाटे साडे तीन वाजता पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतले आहे. अनिस हा पीएफआय संघटनेत शारीरीक शिक्षक असल्याची माहिती मिळाली. अनेक दिवसापासून तो या संघटनेचे काम करीत होता.
गेल्या आठवड्यात २२ सप्टेबर रोजी दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस)मेहरुणमधील दत्त नगरातील एका धार्मिकस्थळावर छापा टाकून अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (वय ३२,रा.रमहेमान गंज, वरुन अपार्टमेंट, जालना) याला ताब्यात घेतले होते. मोमीन हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेचा महाराष्ट्रातील खजिनदार होता. आता पटेल याला पहाटेच ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत शहाद्याचा एक तरुण होता. तो पटेलचा विद्यार्थी असून चौकशीअंती त्याला सोडून देण्यात आले. पटेल याला सीआरपीसी १५१ (३) प्रमाणे स्थानबध्द करण्यात आले असून अटक करण्यात आली. जळगाव दहशतवाद विरोधी शाखा अर्थात एटीसीचे प्रमुख चंद्रकांत पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.