फोटो नंबर : ०९सीटीआर२८
आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जुने जळगाव परिसरात एकाच मोकाट कुत्र्याने एकापाठोपाठ एक चार महिलांना चावा घेतल्याने दुपारच्या सुमारास दहशत पसरली होती. या चारही महिलांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर बाब म्हणजे यातील एक महिला घरात झोपलेली असताना घरात घुसून कुत्र्याने चेहऱ्याला चावा घेतला असून यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून रोज किमान पंधरा लोकांना चावा घेत असल्याच्या घटना घडत आहे. दुसरीकडे मात्र, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे. लोकांचा जीव गेल्यावर या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होईल का? अशा प्रतिक्रिया जखमी महिलांच्या नातेवाइकांनी दिल्या आहेत. रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी झाली होती. पांढऱ्या रंगाचे हे कुत्रे असून त्यानेच चौघा महिलांना चावा घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
१ मेस्कोमाता मंदिर परिसरातील रहिवासी सोनी योगेश पाटील (२०) या दुपारी घरात झोपलेल्या असताना या कुत्र्याने थेट त्यांच्या चेहऱ्याला चावा घेतला. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत दुपारी दीड वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
२ जुने आसोदा रोड परिसरातील रहिवासी रोहिणी ठुसे (२२) या दुपारी अंगणात भांडे घासत असताना कुत्र्याने अचानक येऊन त्यांच्या हाताला चावा घेतला, यात त्या जखमी झाल्या. त्यांनाही दुपारी जीएमसीत दाखल करण्यात आले होते.
३ हेमलता राजेंद्र चौधरी (२३) तसेच संगीता चौधरी (४५) या दोघा महिलांनाही याच एका कुत्र्याने दुपारी १२ वाजेच्या सुमारास चावा घेतला. हेमलता चौधरी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. चौघा महिलांवर जीएमसीत वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील कळसकर यांनी प्रथमोपचार केले. यातील सोनी पाटील या महिलेला गंभीर दुखापत झाल्याने महिलेला डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले.
फोटो कॅप्शन : रुग्णालयात दाखल महिला व उपस्थित नातेवाईक