महावितरणने नाशिक येथील महाराष्ट्र तांत्रिक प्रशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, या संस्थेला बाह्यस्रोत कंत्राटी कामगार पुरविण्याचा मक्ता दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्यास महावितरणतर्फे त्या कामगाराच्या कुटुंबीयांना ३० लाख रुपये इतके अर्थसाहाय्य देण्यात येते. त्यानुसार गेल्यावर्षी जून महिन्यात विशाल पारधी या बाह्यस्रोत कामगाराचा कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना महावितरणतर्फे ३० लाखांची पूर्तता करण्यात आली होती.
मात्र, संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना धनादेश देताना हे अर्थसाहाय्य महावितरणने न देता, आपणच दिले असल्याचे दाखवून कंत्राटदाराने आमदारांच्या हस्ते धनादेश दिला होता. तसेच धनादेश वितरणावेळी महावितरणलादेखील कळविले नाही. या प्रकाराबद्दल बाह्यस्रोत वीज कंत्राटी कामगार संघटनेने ‘त्या’ ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामीण विभागाचे मुख्य अधीक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली होती.
इन्फो :
तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश :
या प्रकाराबद्दल अधीक्षक अभियंता फारुख शेख यांनी संबंधित मक्तेदाराला बजावलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, संबंधित कर्मचाऱ्याला आर्थिक मदत ही महावितरणने दिली असताना, आपल्या संस्थेने ही मदत आपणच दिली असल्याचे दाखविली आहे. ही बाब गंभीर असून, महावितरणची दिशाभूल करणारी आहे. या प्रकाराबाबत तीन दिवसांत खुलासा सादर करावा, अन्यथा महावितरणच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल.