राष्ट्रवादीने दिले तिसरे प्रदेशाध्यक्षपद! शिक्षक सेलच्या अध्यक्षपदी प्रा.दिलीप सोनवणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 20:50 IST2023-09-20T20:48:53+5:302023-09-20T20:50:16+5:30
ग्रंथालयपाठोपाठ महिला सेलची धुरा जळगावकडे

राष्ट्रवादीने दिले तिसरे प्रदेशाध्यक्षपद! शिक्षक सेलच्या अध्यक्षपदी प्रा.दिलीप सोनवणे
कुंदन पाटील -
जळगाव : ग्रंथालय सेलपाठोपाठ महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड केली आणि या निवडीला काही दिवसच उलटत नाही तोच शिक्षक सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार प्रा.दिलीप सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या जबाबदारीमुळे उत्तर महाराष्ट्राला नक्कीच न्याय देता येईल, असा विश्वास प्रा.सोनवणे यांनी बुधवारी व्यक्त केला.
प्रा.सोनवणे यांच्या नियुक्तीनंतर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सध्याचे सरकार ‘कंत्राटी’ आहे. त्यामुळे बेराजेगार युवकांच्या आयुष्याशी खेळ मांडला जात आहे. प्रत्येक क्षेत्रात कंत्राटी भरती तसेच सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मानधनावर सेवेत घेण्याची या सरकारची भूमिका आहे. ही भूमिका नव्या पिढीच्या आयुष्यासाठी घातक आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांसह विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहू, असा विश्वास प्रा.सोनवणे यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील यांनी प्रा.सोनवणे यांचा सत्कार केला. यावेळी अशोक लाडवंजारी, वाल्मिक पाटील, मंगला पाटील, मिनाक्षी चव्हाण, प्रा.शालिनी सोनवणे, उमेश पाटील, एजाज मलिक, मजहर पठाण, सलीम इनामदार, संजय जाधव, इब्राहिम तडवी, रिजवान खाटीक यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
तिसरे प्रदेशाध्यक्षपद वाट्याला
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्षपद जळगावच्या वाट्याला द्यायचे म्हणून निर्णय झाला. त्यानंतर जयंत पाटील यांनी प्रा.सोनवणे यांना नियुक्तीपत्र देत त्यांचा गौरव केला. त्यामुळे जिल्ह्याला तिसरे प्रदेशाध्यक्षपद मिळाले आहे. यापूर्वी ग्रंथालय सेलच्या माध्यमातून उमेश पाटील (अमळनेर) यांना संधी मिळाली. त्यानंतर रोहिणी खडसे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली.त्यानंतर काही दिवसातच प्रा.सोनवणे यांच्याही गळ्यात माळ पडली. त्यामुळे शरद पवारांनी जळगावमध्ये ‘पॉवर’ गेम सुरु केला की काय, अशी चर्चा राजकीय गोटात होती.