Narmadalaya ... Lepa Rehabilitation Nomad | नर्मदालय... लेपा पुनर्वास निमाड
नर्मदालय... लेपा पुनर्वास निमाड

भारती ठाकूर... ‘नर्मदे हर’ पुस्तकाच्या लेखिका म्हणून भारतीताईंची भेट पूर्वी झाली होती. परंतु नर्मदालय संस्थेचा परिचय व काम याविषयी माहिती नव्हती. अविनाशी सेवा पुरस्काराच्या निमित्ताने ही संधी मिळाली. भारतीताई मूळच्या नाशिकच्या. एम.कॉम.नंतर डिफेन्समध्ये अकाउंट्स आॅफिसर म्हणून रुजू झाल्या. साहसाची आवड त्यामुळे अनेक ट्रेकिंग, सायकलिंग अशा मोहिमा केल्या. नोकरीत असतानाच पाच वर्षे रजा घेऊन विवेकानंद केंद्राचे पूर्णवेळ काम करण्यासाठी असाममध्ये गेल्या. तेथे गोलाघाट या दुर्गम भागात काम करत असताना वारंवार उद्भववणाºया मलेरियामुळे त्यांना मनाविरुद्ध परत नाशिकला यावे लागले.
साहसाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे अनेक साहसी मोहिमा, भ्रमंती, भारताच्या बाजूने पायी कैलास-मानसरोवर यात्रा अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. नोकरीत मन रमत नव्हते. घरातील वातावरण, संस्कार यामुळे काहीतरी सामाजिक काम करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. कन्याकुमारी येथे विवेकानंद केंद्रात वास्तव्य असताना भरपूर वाचन, चिंतन, मनन, अनेक विद्वत मंडळींशी चर्चा यातून मनात वेगळेच काही तयार होते. अनेक प्रश्न निर्माण होत होते. त्यांची यथोचित उत्तरे हळूहळू मिळत होती.
अशातच अंतयार्मी उर्मी दाटून आली नर्मदा परिक्रमेची. केवळ निसर्गदर्शन, भाविकता अशा गोष्टींचा विचार भारतीताईंच्या मनात नव्हता. नर्मदेवर बांधल्या जाणाºया धरणांमुळे लाखो वर्षांची प्राचीन परंपरा, नर्मदा खोºयातील संस्कृती, वैविध्यपूर्ण जैविक संपदा धरणाखाली जाण्यापूर्वी डोळे भरून पहावी, त्याच्या नोंदी ठेवाव्यात या विचाराने त्यांनी परिक्रमा करण्याचे ठरवले. नर्मदा किनाºयावरील लोकजीवन पहावे आणि नर्मदा माईच्या किनाºयावरून मार्गाक्रमण करताना स्वत:शीच संवाद साधावा ही कारणे ही परिक्रमा करताना होतीच. नर्मदा परिक्रमा करताना कर्मकांड महत्त्वाचे न मानता भावनांचा आदर करत सहज शक्य होतील त्या नियमांचे आचरण करत भारतीताईंनी सहा महिन्यात परिक्रमा पूर्ण केली. परिक्रमेच्या काळात त्यांनी पाहिलेला निसर्ग, भेटलेली माणसं, त्यांनी केलेले सहकार्य हे सारे अनुभव त्यांनी दैनंदिनीत लिहून ठेवले. 'वसुधैव कुटुुंंबकम'ची अनुभूती सदाव्रताच्या प्रथेतून घेताना सांपत्तिक स्थिती, शिक्षण, सामाजिक प्रतिष्ठा असा असणारा अहंभाव गळून पडण्यास मदत होते हे प्रत्यक्ष अनुभवले .
ही अनुभव गाथा' नर्मदा परिक्रमा... एक अंतर्यात्रा 'या लेखमालेतून व नंतर पुस्तक रूपाने सर्वांसमोर आणली. परिक्रमेदरम्यान पाहिलेले लोकजीवन, शासनाची शिक्षणाच्या सक्षमीकरणाबाबत असणारी अनास्था, कौटुंबिक परिस्थिती यामुळे मुलांची शिक्षणाबाबत होत असणारी हेळसांड ही प्रत्यक्ष पाहिलेली परिस्थिती त्यांना व्यथित करत होती. धरणामुळे विस्थापित झालेल्या आदिवासींना आपले स्वत:चे घर, जमीन आणि नर्मदा माईला सोडून जाताना झालेले दु:ख त्यांनी कसे पचवलं असेल? त्यांना आर्थिक नुकसान भरपाई देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत आणि सर्व जबाबदारी सरकारची असे म्हणून स्वस्थही बसून चालणार नाही, ही भावना भारतीताईंच्या मनात प्रबळ होत गेली आणि एक दिवस नोकरीचा राजीनामा देऊन प्रत्यक्ष काम करण्याचा निर्णय घेऊन भारतीताई नर्मदा किनारी गेल्या. स्वत:च्या कंफर्ट झोनमधून बाहेर पडून एका अनवट वाटेवरचा प्रवास भारतीताईंनी सुरू केला. विशेष म्हणजे स्वत:च्या पेन्शनच्या पैशातून मंडलेश्वर येथे राहून रोजची दहा-बारा किलोमीटरची पायपीट करत आदिवासी मुले आणि महिलांसाठी कामाची सुरुवात केली. सरकारी शाळेमध्ये अक्षर ओळखही न होता विद्यार्थी आठवीपर्यंत जाणाºया विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनौपचारिक शिक्षण सुरू केले. ही संकल्पना घेऊन मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करणे, स्वच्छतेच्या सवयी लावणे यासाठी सुरुवातीला एकटीने लढा दिला. मंडलेश्वर ते आजूबाजूच्या विविध परिसरात, वाड्यांमध्ये जाऊन कुटुंबातील सदस्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे हे काम करावे लागले. अत्यंत गरिबीमुळे व नैसर्गिक परिस्थितीमुळे ही मुले शेतातील कामे करणे, गुरे चरायला नेणे यासाठी कुटुंबात मदत करत असत. लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी पण या मुलांवर होतीच. त्यासाठी कुटुंबाचे मन वळवून या मुलांचा शिक्षणाकडे ओढा वाढावा यासाठी प्रयत्न केले. या सर्व निरपेक्ष भावनेतून चाललेल्या आणि नर्मदामैयाच्या आशिवार्दाने पुढे जाणाºया कामातून एकेक माणूस जोडला जाऊ लागला. भारतीताई यांच्या प्रयत्नातून शाळेत आलेले विद्यार्थी त्यांना मदत करू लागले आणि या चळवळीला 'नर्मदा' या संस्थेचे स्वरूप प्राप्त झाले. बारा-पंधरा पाड्यातून 'नर्मदालया'च्या माध्यमातून अनौपचारिक शिक्षणाचे लोण पसरले. आॅक्टोबर २००२ मध्ये नर्मदालयाची विधिवत स्थापना झाली आणि पूर्व प्राथमिक ते हायस्कूल आणि व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातून निमार प्रदेशातील पंधरा खेड्यांपर्यंत पोहोचले. नर्मदालयचा प्रमुख उद्देश हा औपचारिक व अनौपचारिक शिक्षण, व्यवसायाभिमुख शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या कामासाठी राहिला.
या सर्व प्रयत्नात दैवी शक्तीचा आशीर्वाद नेहमीच आहे असे भारतीताई मानतात. त्याचा अनुभव त्यांना अनपेक्षितपणे आला. एका नागा साधूने त्यांच्या आश्रमाची जागा व बाजूची जमीन नर्मदालय संस्थेला दिली आणि नवीन कामाला सुरुवात झाली. या जागेवर 'रामकृष्ण शारदा निकेतन 'या औपचारिक शाळेच्या माध्यमातून मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी छोटी खरगोन, भट्टान आणि लेपा पुनर्वास याठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या. औपचारिक शिक्षण व संस्कार याबरोबरच सुतारकाम, दुग्ध व्यवसाय, शेती, वेल्डिंग, माती परीक्षण याचे प्रशिक्षण देऊन हे विद्यार्थी ग्रामीण भागाशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडले गेले. केवळ या भागातील वंचित कुटुंबातील मुलांना या शाळेत प्रवेश मिळतो. विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन व शिक्षण हे संपूर्णत: विनामूल्य दिले जाते. विशेष म्हणजे रामकृष्ण शारदा निकेतन लेपा पुनर्वास ही मध्य प्रदेशातील पहिली डिजिटल शाळा बनली. अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग आदी पदवी प्राप्त करते झाले आहेत. या केंद्रांमध्ये शिक्षिका म्हणून अनेक ग्रामीण महिलांना रोजगार मिळाला आहे. या शिक्षकांना देण्यात येणारे ट्रेनिंग त्यांना संपूर्ण आयुष्यासाठी प्रेरक ठरत आहे. या सर्व उपक्रमांसाठी सरकारी मदतीवर अवलंबून न राहता देणगी स्वरूपात रक्कम गोळा करून हा खर्च भागवला जातो. भाभा आॅटोमिक रिसर्च सेंटरच्या मार्गदर्शनाने ग्रामीण तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यात आले. या अभ्यासातून सोलर ड्रायरची निर्मिती या वनवासी विद्यार्थ्यांनी आजपर्यंत नागालँड, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी आॅर्डरनुसार हे सोलर ड्रायर बनवून दिले गेले. हे सर्व काम या संस्थेतील विद्यार्थीच करतात हे वैशिष्टपूर्ण. या विद्यार्थ्यांना विज्ञान आश्रम, पाबळ येथून याप्रकारच्या तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले गेले आहे. 'नर्मदा' संस्थेचा आणखी एक प्रकल्प म्हणजे 'नचिकेत छात्रावास'. आजूबाजूच्या पाड्यांवरून शिक्षणासाठी येणारी मुले या छात्रावासात राहतात. हे सर्व विद्यार्थी स्वयंशिस्तीने, स्वयंस्फूर्तीने, आदर्शवत जीवन जगतात त्याचे दर्शन सुखावून जाते. छात्रावासात राहणाºया व आजूबाजूच्या पाड्यांवरून रामकृष्ण शारदा निकेतनमध्ये शिकण्यासाठी येणाºया विद्यार्थ्यांची सकाळ सुरू होते ती प्रार्थनेने. प्रार्थनेसाठी हे सर्व विद्यार्थी एका हॉलमध्ये जमतात. समोर शारदामाता रामकृष्ण परमहंस व विवेकानंद यांचे फोटो आहेत. मंद तेवणारी समई आणि सर्व मुलांचे मधुर आवाजातील सामुदायिक स्तोत्र पठण. मन आणि शरीर त्या एकतानतेशी जोडले जातात. नर्मदाष्टक, गंगाष्टक याचबरोबर अनेक स्तोत्रे एकसुरात व मधुर आवाजात ऐकणे ही तर प्रसन्नतेची पर्वणीच.
या परिसराची सर्व प्रकारची स्वच्छता विद्यार्थीच करतात. तेही कोणाच्याही आज्ञेशिवाय. कोणत्याही पाठपुराव्याशिवाय. रोजचे नेमून दिलेले काम आनंदाने करणारी ही दहा-बारा वर्षाची मुले पाहिली की आपल्या शहरी भागातील मुलांची याबाबतची मनस्थिती आठवून मन अस्वस्थ होते.
लेपा पुनर्वास भागात शाळा व छात्रावासाच्या नजीकच एक गोशाळेचा प्रकल्पही चालू आहे. तीस-बत्तीस गायी या गोशाळेत आहेत. शाळेतील व छात्रावासातील विद्यार्थी या गाईंची आनंदाने काळजी घेतात. या गायींबरोबर दिवसातला काही वेळ जरूर घालवतात. हा जीवनानुभव त्यांना या भागामध्ये राहण्यासाठी प्रेरित करतो.
'नर्मदा' संस्थेतर्फे या भागातील महिलांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी 'नर्मदा निर्मिती' नावाने शिलाई विभाग सुरू करण्यात आला आहे. स्मोकिंगचे डिझाईन असलेले फ्रॉक्स, लेडीज टॉप, याचबरोबर दोहड, पिशव्या आदी गोष्टी शिकवून त्या महिलांकडून त्याची निर्मिती केली जाते. या वस्तूंना विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. विक्री व्यवस्थेसाठी याच शाळेतून शिकलेल्या मोठ्या विद्यार्थ्यांना तयार केले गेले आहे. 

Web Title:  Narmadalaya ... Lepa Rehabilitation Nomad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.