नोटिसप्रकरणी आता मनपाचे दिलगिरी पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 12:36 AM2019-12-01T00:36:31+5:302019-12-01T00:37:01+5:30

मनपा मालकीचे जागा प्रकरण

Municipal apology letter for notice now | नोटिसप्रकरणी आता मनपाचे दिलगिरी पत्र

नोटिसप्रकरणी आता मनपाचे दिलगिरी पत्र

Next

जळगाव : मनपा मालकिच्या जागेच्या व्यवसायिक वापरप्रकरणी महापालिकेच्या ‘नोटीस जुमला’ चांगलाच रंगला असून नोटीस बजावलेल्या राष्टÑवादी कॉँग्रेसच्या महिला पदाधिकारी मंगला पाटील यांनी अबु्रनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा देताच मनपाने दिलगिरी पत्र देऊन यातून सुटका करून घेण्याच प्रयत्न सुरू केला आहे. नोटीस देणे ही शिपायाची चूक असल्याचे दाखवून मनपाने दिलगिरी व्यक्त करणारे पत्र मंगला पाटील यांना देऊन सुनावनीस उपस्थित न राहण्याचे कळविले आहे.
महापालिकेने ३०० हून अधिक आपल्या मालकीच्या जागा शहरातील विविध सामाजिक जागा सेवाभावीवृत्तीने वापरासाठी दिल्या आहेत. मात्र, १०० हून अनेक सामाजिक संस्थांनी या जागांचा व्यावसायिक वापर सुरु केला आहे. मनपाने सेवाभावी वृत्तीने दिलेल्या जागांचा व्यावसायिक वापर करण्याचा प्रकार स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत मनपाला नोटीस बजाविण्याचे आदेश २२ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत दिले होते. त्यानुसार मनपाच्यावतीने नोटीस बजावल्या जात आहेत.
यामध्ये तत्कालीन नगरपालिकेने १९८८ मध्ये ठराव करुन जागृती महिला मंडळाला सेवाभावी वृत्तीने रिंगरोडवरील जागा वापरण्यासाठी दिली होती. महिला मंडळाने काही वर्षानंतर ही जागा जिल्हा बॅँकेला शाखा सुरु करण्यासाठी भाडेतत्वावर देण्यात आली. मनपाने सेवाभावी वृत्तीने दिलेल्या जागांचा व्यावसायिक वापर करणे नियमबाह्य असतानाही संस्थेने ही जागा जिल्हा बॅँकेला भाडेतत्वावर दिली. त्यामुळे मनपाने या प्रकरणी नोटीस बजावली. मात्र, महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगला बाजीराव पाटील यांना ही नोटीस न बजावता राष्टÑवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी मंगला पाटील यांना ही नोटीस बजावली. तसेच ५ डिसेंबरला मनपाने सुनावणीसाठी हजर राहण्याचेही आदेश दिले.
या नोटीसमुळे मंगला पाटील संतापल्या. माझी कोणतीही महिला संघटना किंवा संस्था नाही, असे त्यांचे म्हणणे असून नोटीस आल्यानंतर मी देखील संभ्रमात असल्याचे सांगत याबाबत मनपा आयुक्तांची भेट घेऊन याबाबत जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मनपाच्या या अजब कारभाराबाबत मनपा विरोधात अबृ्रनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
त्यानंतर हा प्रकार लक्षात येताच ३० नोव्हेंबर रोजी मनपाने मंगला पाटील यांना पत्र देऊन दिलगिरी व्यक्त केली. त्यात म्हटले आहे की, जागृती महिला मंडळाच्या अध्यक्षा समजून शिपायाकडून ही नोटीस देण्यात आल्याचे नमूद केले आहे. तसेच झालेल्या मानसिक त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करीत असून पत्राशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पूर्वीचे पत्र रद्द करण्यात येत असून सुनावनीला येण्याची गरज नसल्याचेही नमूद केले आहे.
मात्र एकूणच या प्रकरणामुळे मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येऊन शिपायाच्या कामावर अधिकाऱ्यांचे लक्ष नसते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मनपाने पत्र दिले असून ते मिळाले आहे. प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून सदर प्रकरणाशी माझा संबंध नसल्याचे पत्रात म्हटले आहे व सुनावनीलाही उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचे कळविले आहे.
- मंगला पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस, जळगाव

Web Title: Municipal apology letter for notice now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव