व्हॉट्सअॅपवर 'बाय' स्टेटस ठेवलं अन् गळफास घेवून जीवनयात्रा संपविली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 22:42 IST2021-01-29T22:42:57+5:302021-01-29T22:42:57+5:30
jalgaon: चिनावल (ता. रावेर) येथील मूळ रहिवासी असलेला अतुल पाटील हा मेहरूण परिसरातील जय भवानी कॉलनी येथे पत्नी वर्षा आणि अर्णव या दोन वर्षाच्या मुलासह वास्तव्यास होता.

व्हॉट्सअॅपवर 'बाय' स्टेटस ठेवलं अन् गळफास घेवून जीवनयात्रा संपविली
जळगाव : बाय असे स्टेटस टाकत मेहरूण येथील अतुल रमेश पाटील (रा. जय भवानी कॉलनी, मेहरूण) या २६ वर्षीय तरूणाने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.
चिनावल (ता. रावेर) येथील मूळ रहिवासी असलेला अतुल पाटील हा मेहरूण परिसरातील जय भवानी कॉलनी येथे पत्नी वर्षा आणि अर्णव या दोन वर्षाच्या मुलासह वास्तव्यास होता. सिंधी कॉलनीतील संत चोखामेळा वसतीगृहासमोर भक्ती नावाचे मेडीकल चालवून अतुल कुटूंबियांचा उदरनिर्वाह करायचा. दरम्यान, कौटुंबिक कारणामुळे दीड महिन्यापूर्वी पत्नी मुलाला घेवून माहेरी निघून गेली होती. त्यामुळे अतुल हा एकटाच होता. अखेर नैराश्यातून गुरूवारी मध्यरात्री त्याने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून जीवनयात्रा संपविली.
मित्र घरी आल्यावर उघड झाला प्रकार
दरम्याऩ अतुल पाटील याने आत्महत्या करण्यापूर्वी गुरूवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास आपल्या मोबाईलच्या व्हॉट्सअॅपच्या 'बाय' असे स्टेटस ठेवले होते. शुक्रवारी सकाळी मित्र आकाश मांडोळे हा घरी आल्यावर त्याला अतुलने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने लागलीच एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनास्थळी पोलिसांची धाव
मेहरूण परिसरात तरूणाने आत्महत्या केल्याचे कळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील यांच्यासह पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. नंतर मृतदेह हा जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. पुतण्याने आत्महत्या केल्याचे कळताच काका शांताराम माणिक पाटील यांनी सुध्दा रूग्णालयात धाव घेतली होती. याप्रकरणी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.