काँग्रेस जळगाव जिल्ह्यात फिरविणार भाकरी ?
By अमित महाबळ | Updated: September 5, 2022 16:47 IST2022-09-05T16:47:12+5:302022-09-05T16:47:40+5:30
वर्षानुवर्षे पक्षाला साथ देऊनही वरिष्ठांकडून अन्याय झाल्याची भावना माजी पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.

काँग्रेस जळगाव जिल्ह्यात फिरविणार भाकरी ?
जळगाव : काँग्रेसच्या जिल्हा प्रभारीपदी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांच्या नियुक्तीनंतर संघटनेत मोठ्या बदलांचे संकेत मिळत असून, आगामी निवडणुकांत भाकरी फिरविण्याच्या इरादा ठेवूनच पक्षाने देशमुख यांच्याकडे जळगावचा पदभार सोपविला असल्याचे कळते.
विनायक देशमुख ३२ वर्षे काँग्रेस संघटनेत कार्यरत असून, त्यांनी जिल्हा युवक काँग्रेस व जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदावर काम केले आहे. प्रदेश सरचिटणीसपदाच्या कार्यकाळात त्यांनी धुळे, नंदुरबार, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे प्रभारी म्हणून काम केले आहे. पक्षाच्या निष्ठावंतांमध्ये त्यांची गणना केली जाते. खा. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचे महाराष्ट्रातील नियोजन त्यांच्याकडे आहे.
बजावली होती मोठी भूमिका
२०१६ ते २०१९ या कालावधीत देशमुख यांच्याकडे जळगाव जिल्ह्याची जबाबदारी होती. याच काळात विधानसभा निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विधानसभेला आ. शिरीष चौधरी निवडून आले. त्यांच्यामागे संघटनात्मक ताकद उभी करण्यात देशमुखांची आघाडी होती. मुक्ताईनगरमध्येही ते पक्षाच्या आदेशानुसार सक्रीय होते. नंतरचा इतिहास सगळ्यांनाच ठावूक आहे.
जागा खेचून आणली
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेश पातळीवरील नेते रावेर मतदारसंघाची जागा काँग्रेसला द्यायला इच्छूक नव्हते. विनायक देशमुख यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पाठपुरावा करून ही जागा पक्षाकडे खेचून आणली होती. देशमुख यांचा जळगाव जिल्ह्याचा चांगला अभ्यास आहे. आता त्यांची पुन्हा जळगावच्या प्रभारीपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीकडे मोठ्या आशेने पाहणारे अनेक जण आहेत.
धाडसी निर्णय घ्यावे लागणार
पक्षात संघटनात्मक पातळीवर मतभेद आहेत. वर्षानुवर्षे पक्षाला साथ देऊनही वरिष्ठांकडून अन्याय झाल्याची भावना माजी पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. स्थानिक पातळीवरील निर्णय चुकल्याने गेल्या काही दिवसांत काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा बँकेत आपल्या हक्काच्या जागा गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे देशमुख यांना संघटनेसाठी काही धाडसी निर्णय घ्यावे लागणार आहेत.
ही होती चमकदार कामगिरी
देशमुख यांच्याकडे चार वर्षे जळगाव जिल्हा होता. त्यानंतर एक वर्ष त्यांनी धुळ्यात काम केले. २०२१ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे सिंधुदुर्ग सोपवले. देशमुखांचा गृह जिल्हा अहमदनगर आहे. तेथून सिंधुदुर्गला जायचे झाल्यास १२ ते १४ तास लागतात. हे अंतर पार करून त्यांनी कुडाळची नगरपंचायत प्रथमच पक्षाला मिळवून दिली. त्यांची याआधीची कामगिरी पाहिल्यास जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला गतवैभव मिळवून देण्याची कामगिरी विनायक देशमुख पार पाडतील का हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.