जळगाव : उपचारार्थ दाखल मुलीला पाहण्यासाठी आलेल्या ज्ञानेश्वर शिवाजी पाटील (रा. शिरसोली प्र. बो.) यांची दुचाकी सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
ज्ञानेश्वर पाटील हे शिरसोली प्र. बो. येथील रहिवासी असून खासगी कंपनीत नोकरीला आहेत. मुलगी मयूरी ही आजारी असल्याने तिला जळगावातील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तिला पाहण्यासाठी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर हे दुचाकीने (एमएच १९ सीजी १५९१) आले होते. मुलीला पाहिल्यानंतर ते घरी जाण्यासाठी ७.१५ च्या सुमारास हॉस्पिटलच्या बाहेर आले असता, त्यांना दुचाकी गायब झालेली दिसून आली. आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता ती आढळून न आल्याने दुचाकी चोरीला गेल्याची त्यांना खात्री झाली. अखेर शुक्रवारी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.