Lalit Kolhe sent to jail | ललित कोल्हे यांची कारागृहात रवानगी

ललित कोल्हे यांची कारागृहात रवानगी

जळगाव : बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणात अटकेत असलेले माजी महापौर ललित विजय कोल्हे यांची सोमवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. दरम्यान, अटक केल्यापासून तपासासाठी न्यायालयाने कोल्हे यांची चार दिवस पोलीस कोठडी दिली होती. या काळात पोलिसांनी एक कार जप्त करण्याव्यतिरिक्त दुसरी कोणतीच कामगिरी केली नाही. सोमवारी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये कोल्हे तपासात उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याचे म्हटले आहे.
ललित कोल्हे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ मे रोजी रात्री १० वाजता अटक केली होती.
शहर पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तपासाधिकारी तथा पोलीस निरीक्षक अरुण निकम यांनी ललित कोल्हे यांचा रिमांड रिपोर्ट न्यायालयात सादर केला.
त्यात गुन्ह्यात वापरलेले रिव्हॉल्वर, खंडणी म्हणून घेतलेले ३ लाख ४४ हजार ७५७ रुपये तसेच साहित्या यांच्या मालकीच्या दोन महागड्या कार हस्तगत करण्यासाठी न्यायालयाने कोल्हे यांना १४ दिवस पोलीस मिळावी म्हणून न्यायालयाकडे विनंती केली.
त्यावर न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली होती.

पोलिसांची मागणी अमान्य
४दरम्यान, या चार दिवसात पोलिसांनी जी कारणे पोलीस कोठडीसाठी सांगितली होती, त्यापैकी फक्त एक कार जप्त केली. दुसरी कार व खंडणी स्वरुपात घेतलेली ३ लाख ४४ हजार ७५७ रुपयांची रोकड जप्त केलीच नाही. या चार दिवसात पोलिसांचा तपास शून्यच राहिला. सोमवारी परत न्यायालयात रिमांड रिपोर्ट सादर करताना तेच जुने कारणे सांगून पाच दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली, मात्र न्यायालयाने पोलिसांची मागणी अमान्य करुन कोल्हे यांची कारागृहात रवानगी केली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली.

Web Title: Lalit Kolhe sent to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.