Lakhs of lac to the young man for bail in murder case | खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी तरुणाला लाखोचा गंडा
खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी तरुणाला लाखोचा गंडा

जळगाव : ट्रक चालकाच्या खुनाच्या गुन्ह्यात काराृहात असलेल्या आरोपीचा जामीन मिळवून देण्याच्या नावाखाली आरोपीच्या भावास चंद्रकांत गणपत सुरळकर (३६, रा.टॉवर चौक, जळगाव) याने १ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली आहे. सुरळकर हा स्वत: खुनाच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असून जामीनावर असताना त्याने हा गुन्हा केला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा शिवारात मोहम्मद सद्दाम हुसेन मोहम्मद (२५, रा.प्रतापगढ, उत्तर प्रदेश) या ट्रक चालकाचा तेल चोरीसाठी दोन जणांनी आॅगस्ट महिन्यात खून केला होता. या प्रकरणात विशालसिंग अमरनाथसिंग राजपूत (रा.बिहटा, पो.पथी, ता. फुलपुर, जि.अजमगढ, उत्तर प्रदेश) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या गावातून अटक केली होती.
जामीनाच्या आशेवर लॉजमध्ये वास्तव्य
चंद्रकांत सुरळकर याने जामीनाची जबाबदारी घेतल्यानंतर सौरभसिंग याच्याकडून सुरुवातीला ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर ३० हजार रुपये घेतले. परत २५ हजार रुपये दिले. ही सर्व रक्कम तो उत्तर प्रदेशातून सुरळकर याच्या बॅँक खात्यात वर्ग केले. त्यानंतर ६ नोव्हेंबरला तो जळगावात आला. शहरातील एका लॉजमध्ये वास्तव्य केले. रेल्वे स्टेशनवर आल्या आल्या सुरळकर याला काही रक्कम दिली. त्यानंतर परत सॉल्वंसीसाठी ६० हजार रुपयांची मागणी केली. पैसे परत दिले नाहीत तर तुला मारुन टाकेन, तुला गावाला परत जावू देणार नाही अशा धमक्या द्यायला सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सौरभसिंग याने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांची भेट घेतली. रोहोम यांनी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याशी संपर्क करुन घटनेची माहिती दिली. त्यानंतर उपनिरीक्षक सुधाकर लहारे, सहायक फौजदार अशोक महाजन, रवींद्र पाटील, सुधाकर अंभोरे, दीपक पाटील, दादाभाऊ पाटील, विनोद पाटील, अनिल जाधव, अनिल देशमुख, पल्लवी मोरे, विनयकुमार देसले व दर्शन ढाकणे यांच्या पथकाने सापळा रचून चद्रकांत सुरळकर याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, त्याच्याविरुध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
न्या.सानप यांच्या नावाचे बनावट आदेश
पोलिसांनी चंद्रकात सुरळकर याला अटक करुन झडती घेतली असता त्याच्याकडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांच्या नावाचे बनावट जामीन आदेश आढळून आले आहेत. या आदेशावर सानप यांचे नाव असले तरी सही व शिक्का नाही. या आदेशाच्या प्रती पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
कारागृहात झाली ओळख
विशालसिंग गुन्हा उघडकीस आल्यापासून कारागृहात आहे. त्याच काळात चंद्रकांत सुरळकर हा देखील शहर पोलीस स्टेशनच्या एका खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. तेथे विशालसिंग याच्याशी त्याची ओळख झाली. काही दिवसांनी सुरळकर याला जामीन मंजूर झाला. तेव्हा तुलाही जामीन मिळवून देतो असे सांगून त्याने विशालसिंगला सांगितले. त्यानुसार विशालसिंग याने त्याचा भाऊ सौरभसिंग याच्याशी संपर्क करुन देत पुढील व्यवहार सुरळकरशी करण्याबाबत सांगितले.

Web Title: Lakhs of lac to the young man for bail in murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.