भडगाव तालुक्यातील खेडगाव येथे पीकवर्धक समजून फवारले तणनाशक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 18:00 IST2019-08-07T17:58:31+5:302019-08-07T18:00:07+5:30
शेतकरी मधुकर रामचंद्र वाणी यांच्या तीन बिघे कपाशीवर तणनाशक फवारणी केल्याने पिकाने मान टाकली आहे.

भडगाव तालुक्यातील खेडगाव येथे पीकवर्धक समजून फवारले तणनाशक
खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : येथील शेतकरी मधुकर रामचंद्र वाणी यांच्या तीन बिघे कपाशीवर तणनाशक फवारणी केल्याने पिकाने मान टाकली आहे.
पिकाच्या वाढीसाठी म्हणून संवर्धक समजून गेल्या वर्षाच्या गव्हात वापरले जाणारे २-४डी हे तणनाशक चुकीने त्यांनी कीटकनाशकात मिसळून फवारणी केली. याचा तत्काळ विपरित परिणाम दिसू लागला. दिड-दोन महिन्याची जोमदार कपाशी वाया गेल्याची लक्षणे दिसू लागताच शेतकरी हादरला. वाणी अल्प-भूधारक आहेत. त्यांच्याकडे एवढीच शेती असून, उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. अशा बाधीत कपाशीवर उपाय करुनही फारसे उत्तम येत नाही, हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू
तीन बिघे कपाशी वाया गेल्याने, शेतकºयाचे अंदाजे दीड-दोन लाख उत्पन्न शिवाय आजवर कपाशीवर २५ हजारांचा खर्च झाला आहे. तोदेखील बुडाला. यामुळे कुुटुुंंबातील सर्वच जणांच्या डोळ्यात अश्रू होते. मजुरी न लागू देता घरच्या घरी शेतातील कामे केली. मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. कुटुुंंबाची परिस्थिती बेताचीच असल्याने ग्रामस्थांमधूनदेखील असे व्हायला नको होते ही भावना उमटत आहे.
शेतकºयांनो तणनाशक जपून वापरा
येथीलच दुसरे शेतकरी प्रकाश मुकुंदा हिरे यांनी कपाशीच्या शेतातील तण नष्ट करण्यासाठी तणनाशक मारले. त्याचीदेखील एकरावरील कपाशीला बाधा झाली आहे. सध्या सततच्या पावसामुळे वाफसा होत नाही. यामुळे निंदणी थांबून शेतात तण माजले आहे. यामुळेच शेतकरी तणनाशक फवारत आहेत. तरीदेखील माहिती करुन व काळजी घेत, शिफारस केलेल्या तणनाशकाची फवारणीच करावी, असा यावर कृषितज्ज्ञांचा सल्ला आहे.