जांभोऱ्याचे सरपंच विशाल चव्हाण यांचे अपघाती निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 21:38 IST2021-03-16T21:37:56+5:302021-03-16T21:38:19+5:30
जांभोरा गावचे सरपंच विशाल चव्हाण यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. १५ फेब्रुवारी रोजी ते सरपंचपदी विराजमान झाले होते.

जांभोऱ्याचे सरपंच विशाल चव्हाण यांचे अपघाती निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
एरंडोल : जांभोरा तालुका धरणगाव येथील ३० वर्षीय विशाल प्रकाश चव्हाण यांना १५ तारीख शुभ ठरल्यामुळे ते १५ फेब्रुवारी रोजी जांभोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवडून आले. परंतु दुर्दैव असे की, १५ मार्च या तारखेला रात्री ११.३५ वाजण्याच्या सुमारास एरंडोल कासोदा रस्त्यावर खडकेसीम गावाजवळ त्यांचे अपघाती निधन झाले आहे.
जांभोरे (ता. धरणगाव) येथील विशाल प्रकाश चव्हाण हे चारचाकी वाहनाने पाचोरा येथे त्यांच्या भावाला घ्यायला गेले होते. परतीच्या प्रवासात कासोदा एरंडोल दरम्यान स्वीफ्ट गाडीमधील खडकेसीम गावाजवळ पेट्रोल संपले. त्यामुळे ते गाडीतून बाहेर आले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप गाडीने (एमएच १८ एए ५१२०) धडक दिली. त्यात विशाल प्रकाश चव्हाण यांचा करुण अंत झाला.
ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ते युवा सेना उपतालुकाप्रमुख म्हणून काम पाहात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, बहिणी, मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्थानकात पिकअप गाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र तायडे, संदीप सातपुते व अकील मुजावर हे पुढील तपास करीत आहेत.