हातावरील 'आई' शब्दावरून मृतदेह ओळखला; मुलाची वाट पाहणाऱ्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 14:00 IST2025-09-17T13:54:59+5:302025-09-17T14:00:24+5:30

जळगावमध्ये रेल्वेच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर तीन दिवसांनी त्याची ओळख पटली.

Jalgaon Youth dies in train collision Body identified from word mother on hand | हातावरील 'आई' शब्दावरून मृतदेह ओळखला; मुलाची वाट पाहणाऱ्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

हातावरील 'आई' शब्दावरून मृतदेह ओळखला; मुलाची वाट पाहणाऱ्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Jalgaon Accident : कामावर जात असल्याचे सांगून गेलेला आकाश सुरेश सपकाळे याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. दोन दिवसांपासून तो घरी न परतल्याने पोलीस ठाण्यात घरच्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह आकाशचाच असल्याचे समोर आलं. एकीकडे मुलाची प्रतीक्षा करत असताना थेट त्याच्या मृत्यूची वार्ताच घरी आल्याने सपकाळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला.

जळगाव ते भादली दरम्यान असलेल्या अपलाईनवर १३ सप्टेंबर रोजी रेल्वेच्या धडकेत अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अनोळखी म्हणून नोंद होती. १५ सप्टेंबर रोजी आकाश सपकाळे हा बेपत्ता असल्याची तालुका पोलिस ठाण्यामध्ये नोंद असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी पोलिसांनी सपकाळे कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बोलावले.

रुग्णालयात मयताच्या अंगावरील शर्ट व त्यांच्या हातावर गोंदलेल्या 'आई' शब्दावरून आकाशचे काका व भावाने त्याची ओळख पटवली. आकाश सपकाळे हा १३ रोजी एमआयडीसीमध्ये कामावर जातो असे आईला सांगून घरातून निघून गेला होता. मात्र रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. आकाशच्या  पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुलाला भेटून जळगावला येणाऱ्या दाम्पत्याचा अपघात; पत्नी ठार, पती व चालक जखमी

पुणे येथे मुलाला भेटून घरी परतणाऱ्या दाम्पत्याच्या कारला ट्रेलरने धडक दिल्याने कारचा पूर्णपणे चुराडा होऊन मिताली सुहास पाटील या ठार झाल्या. त्यांचे पती सुहास राजाराम पाटील (६०) व चालक योगेश नारायण बारी (३५) हे जखमी झाले. सोमवारी रात्री अजिंठा घाटाच्या पायथ्याशी झाला. निवृत्त कृषी अधिकारी सुहास पाटील व मिताली पाटील हे दाम्पत्य चालक योगेश बारी याच्यासह कारने पुणे येथे मुलाला भेटण्यासाठी गेले होते. तिथून ते सोमवारी जळगाव येथे घरी परत येत होते.

अजिंठा लेणी टी पॉईट नजीक मागून येणाऱ्या ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटले व तो थेट कारवर येऊन धडकला. अपघातानंतर अजिंठा घाटात वाहतूक खोळंबली होती. धडक एवढी जोरात होती की, कार या ट्रेलरच्या खाली दबून तिचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पाटील यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहचले. स्थानिकांच्या मदतीने ट्रेलर खालून कार काढण्यात आली व कारमध्ये अडकलेल्या तिघांनाही जळगाव येथे आणण्यात आले. मात्र मिताली पाटील यांचा मृत्यू झाला होता.
 

Web Title: Jalgaon Youth dies in train collision Body identified from word mother on hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.