जळगावात भरधाव ट्रकने मोहाडीच्या महिलेला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 13:24 IST2018-02-05T13:20:02+5:302018-02-05T13:24:56+5:30
नातेवाईकांकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावर झाला अपघात

जळगावात भरधाव ट्रकने मोहाडीच्या महिलेला चिरडले
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.५ : अमळनेर तालुक्यातील भरवस येथे नातेवाईकांकडे दुचाकीने जात असलेल्या वसंत पंडीत खैरनार (वय ६०) व त्यांच्या पत्नी मिराबाई खैरनार (वय ५२) रा.मोहाडी, ता.जळगाव या दाम्पत्याला मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने ट्रकच्या टायरखाली येऊन मिराबाई खैरनार यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी साडे सात वाजता महामार्गावर बांभोरी येथील जैन इरिगेशन या कंपनीच्या समोर झाला.
वसंत खैरनार व त्यांच्या पत्नी मीराबाई भरवस येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी दुचाकीने (क्र. एम.एच.१९ ए.जे.४४१७) सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडले. बांभोरीजवळ जैन इरिगेशन कंपनीजवळ मागून आलेल्या ट्रकने (क्र.डब्यु.बी.२३ ई ९४१५) जोरदार धडक दिली. त्यात वसंत खैरनार हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले तर त्यांच्या पत्नी रस्त्यावर पडल्याने या ट्रकचे टायर त्यांच्या अंगावरुन गेले. त्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या.
मिस्तरी काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह
खैरनार यांची परिस्थिती साधारण आहे. त्यांना एक मुलगा व पाच मुली आहे. त्यापैकी तीन मुलींचे लग्न झालेले असून मुलगा हरिलाल व दोन मुली अविवाहित आहेत. मिस्तरी काम करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. आई ठार झाल्याने मुलांना मोठा धक्का बसला. जिल्हा रुग्णालयात त्यांनी प्रचंड आक्रोश केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह मोहाडी येथे नेण्यात आला. याप्रकरणी पाळधी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
पत्नीचा मृतदेह पाहून पती बेशुद्ध
अंगावरुन ट्रक गेल्याने मिराबाई यांच्या शरीरातील मांस बाहेर आले. ते रस्त्यावर पसरले होते. या अपघातात जखमी झालेल्या वसंत खैरनार हे प्रकार पाहिल्यावर जागेवरच बेशुध्द पडले. दरम्यान, जैन इरिगेशन कंपनीच्या सहकाºयांनी तत्काळ पाळधी पोलिसांना घटनेची माहिती कळवून घटनास्थळ गाठले. सहायक फौजदार रमेश पाटील, किरण धमके व सुमित पाटील यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तर अपघातग्रस्त ट्रक व दुचाकी ताब्यात घेतली. दरम्यान, घटना घडल्यानंतर चालक ट्रक सोडून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.