जळगावात मोठा अपघात; गव्हाने भरलेला भरधाव ट्रक गेट तोडून रेल्वेवर आदळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 11:29 IST2025-03-14T08:11:15+5:302025-03-14T11:29:07+5:30
बोदवडनजीक पहाटेची घटना, जिवीत हानी टळली

जळगावात मोठा अपघात; गव्हाने भरलेला भरधाव ट्रक गेट तोडून रेल्वेवर आदळला
गोपाल व्यास
बोदवड (जि.जळगाव) : धान्याने भरलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रेल्वे गेट तोडून मुंबई - अमरावती एक्सप्रेसच्या इंजिनवर जाऊन धडकला. यात कुठलिही जिवित हानी झाली नाही. ही घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजता बोदवड रेल्वेस्थानकापासून ५०० मीटर अंतरावर घडली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते अमरावती डाऊन एक्सप्रेस (क्.१२१११) ही गाडी सकाळी पाच वाजेच्या दरम्यान बोदवड रेल्वे गेट जवळून जात होती. त्याचवेळी बंद असलेले रेल्वेगेट तोडून एक ट्रक रेल्वे मार्गात घुसला आणि रेल्वे इंजिनवर जाऊन आदळला. इकडे एक्सप्रेसची गती कमी असल्याने चालकाने ब्रेक लावून गाडी थांबवली. तर ट्रक इंजिनवर धडकताच ट्रकचालक उडी घेत पसार झाला. एक्सप्रेस चालकाने तात्काळ ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र एक्सप्रेसमध्ये झोपलेले प्रवासी बर्थवरुन खाली पडले.
अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम
बोदवडनजीक झालेल्या अपघातामुळे रेल्वेची हाय टेन्शन वायर तुटली आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अमरावती एक्सप्रेस त्याठिकाणीच थांबविण्यात आली आहे. डाऊन मार्गावरील महाराष्ट्र एक्सप्रेस, भुसावळ - बडनेरा मेमू आणि शालिमार एक्सप्रेस या गाड्या तसेच अप मार्गावरील चेन्नई- अहमदाबाद एक्सप्रेस, वर्धा- भुसावळ या गाड्या ३ते ४ तास उशिराने धावत आहेत.