जळगाव जिल्ह्यात २० हजार नवीन मतदारांची जिल्ह्यात भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:07 IST2019-07-27T12:05:32+5:302019-07-27T12:07:22+5:30
१९ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध होणार अंतिम यादी

जळगाव जिल्ह्यात २० हजार नवीन मतदारांची जिल्ह्यात भर
जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ निहाय अंतिम मतदार यादी १९ आॅगस्टला प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे १९ आॅगस्टपर्यंत आचारसंहिता लागू होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक विभागाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदार नोंदणी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात २० हजार नवीन मतदारांची भर पडली आहे. २७ व २८ जुलै रोजी पुन्हा विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्यांची नावे नोंदविणे बाकी असेल अशा मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुका होणार का? अशी चर्चा सुरू होती. मात्र विधानसभा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे नंतर स्पष्ट झाले. मात्र आता निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार? याबाबत उत्सुकता आहे.
त्यादृष्टीने आमदारांकडून कामे तातडीने मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र निवडणूक आयोगाकडून आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार विधानसभेसाठीची अंतीम मतदार यादी १९ आॅगस्टला प्रसिद्ध होणार आहे. ही मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागणार असल्याने १९ आॅगस्टपर्यंत आचारसंहिता लागणार नाही, असे स्पष्ट झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दोन दिवस विशेष मतदार नोंदणी मोहीम
भारत निवडणूक आयोगाकडील ११ जुलैच्या पत्रान्वये १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा संक्षिप्त कार्यक्रम सध्या सुरू आहे.
सदर कार्यक्रमानुसार १५ ते ३०जुलै २०१९ या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. १५ ते ३० जुलै या कालावधीत मतदार नोंदणी मोहीम राबविली जात असून २७ व २८ जुलै रोजी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. त्यात नवीन मतदार नोंदणी, नावात दुरुस्ती, नाव एका भागातून दुसरीकडे स्थलांतरीत करणे आदी कामे तातडीने केली जाणार आहेत. नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान १५ ते २१ जुलै या कालावधीत एकूण ५ हजार २८ अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले. त्यात नवीन मतदार नोंदणीचे २९५५ अर्ज, नाव वगळण्यासाठीचे ११२० अर्ज तर नावात दुरुस्तीचे ८५६ व स्थलांतराचे ९७ अर्ज प्राप्त झाले आहेत.
दुरुस्तीसाठी आले ३७ हजार अर्ज
लोकसभा निवडणुकीसाठी अंतीम मतदार यादी ३१ जानेवारी रोजी जाहीर झाली होती. त्यावेळी जिल्ह्यात ३४ लाख ५ हजार २६८ मतदार होते. तर हीच संख्या १५ जुलै २०१९ पर्यंत ३४ लाख २६ हजार ४०६ वर पोहोचली. ३१ जानेवारीपासून आजपर्यंत नवीन नोंदणीसाठी ३४ हजार ८०१ मतदारांचे अर्ज आले असून नाव वगळण्यासाठी १४ हजार १७६ अर्ज, नावात दुरूस्तीसाठी ३७ हजार १२५ अर्ज तर स्थलांतराचे १०२५ अजर् आले आहेत. त्यानुसार नवीन मतदारांमध्ये आतापर्यंत २० हजारांची भर पडली आहे.