कष्टकरी मायबाप, शुभम पीएसआय झाला; बहीणीचे स्वप्न होते, भावाने पूर्ण केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 12:00 IST2024-08-06T11:58:41+5:302024-08-06T12:00:26+5:30
मोलमजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या लेकाची आकाशाला गवसणी

कष्टकरी मायबाप, शुभम पीएसआय झाला; बहीणीचे स्वप्न होते, भावाने पूर्ण केले
प्रशांत भदाणे
घरात अठराविश्व दारिद्र्य... वडिलांना पॅरालेसिस झाल्याने मोलमजुरी करून कसबसे घर चालवणारी आई... तरीही 'तो' खचला नाही. परिस्थितीशी लढला आणि शेवटी अधिकारी झाला. प्रतिकूल परिस्थितीत पीएसआय झालेल्या शुभम शिंदेची संघर्ष कहाणी इतरांना बळ देणारी ठरणार आहे.
शुभम हे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निरुळ गावचे रहिवासी आहेत. सध्या या गावात शुभमचीच चर्चा सुरु आहे. एमपीएससीच्या नुकत्याच लागलेल्या निकालात शुभम पीएसआय झाला. त्यामुळे गावात दिवाळी साजरी झाली.
शुभमला हे यश सहजासहजी मिळालेले नाही. त्याची संघर्ष कहाणी ऐकाल तर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. खरेतर शुभमच्या बहीणीला अधिकारी व्हायचे होते. परंतू सामाजिक परिस्थिती आड आली. मग तिने भावात आपले स्वप्न बघितले. शुभमच्या पाठीशी खंबीर उभी राहिली. मावस भावानेही साथ दिली आणि शुभम पीएसआय झाला. स्पर्धा परीक्षेचं फिल्ड वाटतं तेवढं सोपं नाही. पण मेहनत करायची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही... असं शुभम सांगतो.